मान्सूनपूर्व कामाची दिरंगाई
। दिघी । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन-श्रीवर्धन मार्गावरील पोहामील नाका ते दत्तमंदिर रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य सद्या वाहन चालकासाठी डोकेदुखी ठरत आहे. पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी टाकण्यात येणार्या मोर्यांचे काम भर पावसात सुरू केल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, याकडे बांधकाम विभागाच्या अधिकार्यांचे दुर्लक्ष झाले आहे.
बोर्लीपंचतन शहराच्या पोहामील नाका ते दत्तमंदिर हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत्या आहे. येथील सकल भागात पावसाचे पाणी मोठया प्रमाणात साचते. त्यामुळे मागील वर्षी येथील रहिवाशांना घरातील सामानाचे नुकसान सोसून इमारतीच्या मजल्यावर आसरा घ्यावा लागला. या समस्येवर उपाय म्हणून ग्रामपंचायतकडून पाणी निचरा होण्यासाठी प्रत्येक ठिकाणी नवीन मोरी टाकण्यात यावी अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली. मात्र, हे मंजूर काम मान्सूनपूर्व पूर्ण होणे गरजेचे असताना,गेल्या तीन आठवड्यापासून सुरू झालेल्या कामात दिरंगाई होत असल्याने आता पावसाळ्यात रस्त्यावरील चिखलाच्या साम्राज्यमुळे अपघाताचा धोका वाढत आहे.
सद्यःस्थितीत एका मोरीचे काम पूर्ण होत आहे. अजून आठ ते दहा ठिकाणी मोर्यां बसवण्यात येणार आहेत. तसेच रस्त्याचे डांबरीकरण सुध्दा करण्यात येणार आहे. मात्र, सद्या या रस्त्यावर ये-जा होणार्या दोन वाहनांना अपुर्या जागेअभावी अनेक अपघातही झाले आहे. नियोजनाअभावी मुख्य रस्त्याचे काम सुरू करताना त्याचा वाहतुकीवर परिणाम झालं आहे. संथ गतीने होत असलेल्या कामामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.