कोटनाका-बोकडविरा रस्ता निकृष्ट दर्जाचा

स्थानिकांकडून गंभीर आरोप, चौकशीची मागणी

| उरण | प्रतिनिधी |

उरण शहरातील कोटनाका ते बोकडविरा दरम्यान, उरण रेल्वे स्थानकासमोर सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामावर निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. या कामाबाबत वारंवार तक्रारी होऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उरण विभागातील वरिष्ठ अधिकारी आर्थिक साटेलोटामुळे दुर्लक्ष करत असल्याची चर्चा सध्या जनतेमध्ये रंगू लागली आहे. काही महिन्यांपूर्वी कोटनाका परिसरातील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला होता. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांकडे तक्रारी करून विचारणा केली असता, संबंधित अभियंत्यांकडून काम योग्य पद्धतीनेच झाले आहे, असा दावा करण्यात आला.

दरम्यान, आता उरण रेल्वे स्थानकासमोर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामामध्येही निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याची ओरड नागरिकांकडून होत आहे. या संदर्भातील वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध होऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना याचे काहीही देणेघेणे नसल्याचे चित्र दिसत असल्याची नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत. तसेच संबंधित ठेकेदाराकडून मंजूर ऑर्डरनुसार काम होत नसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या कामासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी नागरिकांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागवली असता, अधिकाऱ्यांकडून लेखी माहिती देण्याऐवजी कार्यालयात येऊन कागदपत्रे पाहावीत, असे उत्तर देण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उरण तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या सर्व रस्ते कामांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आता उरणच्या जनतेतून जोर धरू लागली आहे.

Exit mobile version