संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी तहसीलदारांकडे धाव
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील कोटिंबे गावात जमीन वर्ग-2 वरून वर्ग-1 करण्याच्या प्रक्रियेदरम्यान पंचनामा चुकीच्या पद्धतीने केल्याचा गंभीर आरोप शेतकरी कृष्णा श्रीराम जाधव यांनी केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.
मौजे कोटिंबे येथील सर्वे क्रमांक 101/8 व 102 या जमिनीबाबत 22 डिसेंबर 2025 रोजी काळूराम वाळकू सोनावणे यांनी वर्ग-2 जमीन वर्ग-1 करण्यासाठी तहसीलदार कार्यालयात अर्ज केला होता. या अर्जावरून तहसीलदारांनी मंडळ अधिकारी कशेळे यांना पडताळणी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. मंडळ अधिकाऱ्यांनी अहवाल सादर केल्यानंतर तहसीलदारांकडून वर्ग-2 चे वर्ग-1 मध्ये रूपांतर करण्याचे आदेशपत्र जारी करण्यात आले.
यानंतर 16 जानेवारी 2026 रोजी तलाठी, कोटिंबे यांनी संबंधित नोंद केली. मात्र, हा अहवाल चुकीच्या माहितीवर आधारित असल्याचा दावा करत कृष्णा जाधव यांनी 19 जानेवारी रोजी हरकत नोंदवली. तरीदेखील, मंडळ अधिकारी कशेळे यांनी 25 जानेवारी 2026 रोजी, म्हणजेच सुट्टीच्या दिवशी (रविवारी) ही नोंद मंजूर केल्याचा आरोप आहे.
पंचनामा करताना ग्रामस्थ म्हणून ज्यांची नावे दाखवली गेली, ते पंच गावाबाहेरील असून, त्यांचा संबंधित जमिनीशी काहीही संबंध नाही. तसेच पंचनाम्यावेळी पोलीस पाटील, कोतवाल किंवा शेजारील शेतकऱ्यांची विचारणा करण्यात आली नाही, असा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. सातबारा उताऱ्यावर नोंद असलेल्या व्यक्तींची संमती न घेता पंचनामा केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
यासंदर्भात राम संभाजी सोनवणे यांनीही हरकत घेतली होती. मात्र, तीही सुट्टीच्या दिवशी मंजूर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तहसीलदार कार्यालयात भेट दिल्यानंतर अशा प्रकारचे अनेक चुकीचे पंचनामे आढळल्याचा दावा संबंधित शेतकऱ्यांनी केला आहे.
खोटा पंचनामा करून फसवणूक
मंडळ अधिकारी बाबासाहेब शेटे यांनी ग्रामस्थांचे खोटे जबाब नोंदवून चुकीचा पंचनामा तयार केल्याचा आरोप करत, त्यांच्याविरोधात कायदेशीर चौकशी करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शेतकरी कृष्णा जाधव यांनी केली आहे. तसेच तलाठी व संबंधित अधिकाऱ्यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.







