| पनवेल | प्रतिनिधी |
कामोठे पोलिसांच्या तत्परतेमुळे एका विवाहित महिलेचा जीव बचावल्याची घटना घडली आहे. कामोठे परिसरातून बेपत्ता झालेल्या महिलेने पतीला फोन करून मला वाचवा, मी अडचणीत असल्याची माहिती दिली होती. या एका फोनवरून कामोठे पोलिसांच्या पथकाने मध्य प्रदेशातल्या मोयाखेडा गावातून तिची सुखरूप सुटका केली आहे. त्या ठिकाणी तिला एक लाखाला विकून तिचे जबरदस्तीने लग्न लावल्याचे समोर आले. ही महिला महिन्यापूर्वी बेपत्ता झाली होती. कौटुंबिक वादातून तिने घर सोडल्याची तक्रार पतीने पोलिसांकडे केली होती. यानुसार पोलिसांकडून तिचा शोध सुरू होताच, परंतु तिच्याकडे मोबाइल नसल्याने शोध कुठे व कसा घ्यायचा, असा प्रश्न पोलिसांपुढे होता.
अशातच तिच्या पतीच्या मोबाइलवर एक फोन खणखणला असता पोलिसांना तपासाची दिशा मिळाली. अज्ञाताच्या फोनवरून त्यांच्या पत्नीने त्यांना संपर्क साधून आपण धोक्यात असल्याची कल्पना दिली होती. याबाबत पतीने पोलिसांना कळवताच या नंबरवर संपर्क साधला असता, मध्य प्रदेशमधील ठिकाणाची माहिती मिळाली. मात्र, प्रत्यक्षात कामोठे पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले. काही केल्या त्या महिलेचा शोध घेऊन तिची सुटका करायची या जिद्दीवर कामोठे पोलीस पथक उतरले होते. पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक विमल बिडवे यांनी पतीच्या तक्रारीवरून महिलेच्या अपहरण व विक्रीचा गुन्हा दाखल केला. त्या आधारे सहायक निरीक्षक अरविंद मसलकर, संजय झोळ, प्रमोद कोकाटे आदींच्या पथकाने मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने सर्च ऑपरेशनमध्ये अखेर महिलेला शोधले. चौकशीत तिची एक लाखाला विक्री करून लग्न लावल्याचे समोर आले. कौटुंबिक वादातून घर सोडल्यानंतर ती कल्याण परिसरात गेली. त्या ठिकाणी भेटलेल्या व्यक्तीने सुखी जीवनाचे स्वप्न दाखवून तिला मध्य प्रदेशात नेऊन विकले होते. परंतु, कामोठे पोलिसांनी अहोरात्र मेहनत घेत महिलेला शोधून काढले.