माथेरानच्या माळी कामगारांचे जीवन अंधकारमय

| माथेरान | वार्ताहर |

माथेरानचा शोध सन 1850 मध्ये ठाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी सर ह्युज मॅलेट यांनी लावला होता. त्यावेळी अनेक धनदांडग्या पारसी लोकांनी इथल्या निसर्गरम्य वातावरणात संपूर्ण जंगल भागात जवळपास 250 प्लॉट विकत घेऊन त्याजागी आलिशान बंगले उभारले. तेव्हापासून ते अजमितीपर्यंत या सर्व बंगल्याची देखभाल, स्वच्छता माळी कामगार आपल्या कुटुंबासह तीन ते चार पिढ्यांपासून इमानेइतबारे करत आहे. आजही अनेक बंगलेधारक मुंबईत स्थित असून केव्हातरी वर्षाकाठी हजेरी लावतात. त्यामुळे या बंगल्याची अतिवृष्टीमुळे दुरवस्था झाली आहे याबाबत या बंगलेधारकांना काही एक स्वारस्य दिसत नाही. बहुतांश बंगले शेवटची घटका मोजत आहेत. काही बंगल्याच्या जागी फक्त जोता शिल्लक राहिला आहे. तर काही बंगले अक्षरशः खंडर बनले आहेत. बाजूलाच माळ्याना पूर्वीपासून दिलेल्या छोट्याशा खोलीत हे माळी कामगार आपल्या कुटुंबासहित सर्वच ऋतूमध्ये आपले जीवन कंठीत असतात.

काहीजण तर केवळ जेमतेम 200 ते 300 रुपयांच्या तुटपुंज्या पगारावर आजही कसेतरी दिवस ढकलत आहेत. बाजारपेठापासून हे सर्व बंगले तीन ते चार किलोमीटर दूरवर आहेत. बहुतेक बंगले जवळपास जमीनदोस्त झाल्याने पावसाळ्यात विंचू सापाचे भय असते. काही बंगले धारकांनी आपले बंगले विकून परदेशात स्थायिक झाले आहेत. अशावेळी त्या माळी कामगारांना क्षुल्लक रक्कम देऊन बाहेर काढले जाते. गावात जागा उपलब्ध नाहीत त्यामुळे कुठेतरी आडोश्याला एखादी झोपडी बांधून रहात आहेत. पिढ्यानपिढ्या बंगल्याची सेवा करणाऱ्या ह्या माळ्यांना जुन्या मालकाने बंगल्याची विक्री केल्यावर निदान पुरेशी रक्कम दिल्यास त्यांचा भविष्यातील प्रापंचिक कारभार सुरळीत चालू शकतो. परंतू अनेकदा माळी कामगारांची कुचंबणा होताना दिसत आहे. काहीनी बंगले विक्री केल्यावर नवीन मालकाने माळ्याचे वीज,पाणी कनेक्शन बंद केल्याचेही निदर्शनास आले आहे. अशाठिकाणी शिवसेनेचे शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी यांनी आपल्या हॉटेलमधील पाणी पुरवठा करून माळी कामगाराला आधार दिला आहे.

आम्ही एव्हर्ट लॉज बंगल्याचे माळी काम अनेक वर्षांपासून पाहतो. आमच्या मालकिणीने हा बंगला ट्रस्टमध्ये जमा केला आहे. ती परदेशात राहते. इकडे कधीही येत नाही. केव्हातरी वर्षातून एकदा मुंबईमधून मॅनेजर येऊन फक्त मोडकळीस आलेला बंगला पाहतो. बंगल्याची भयाण अवस्था असून कुणी खरेदीसाठी आले तर ट्रस्टीकडून विक्री केली जात नाही. त्यामुळे आमचे इकडे आड तिकडे विहीर अशीच स्थिती झाली आहे.


विकास पार्टे, माळी कामगार माथेरान


Exit mobile version