अस्मानी संकटाने बळीराजाचा जीव गुदमरला

जिल्ह्यावर ओल्या दुष्काळाचे सावट

| रायगड | खास प्रतिनिधी |

जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करायचे ठरवले तरी आता हातामधून वेळ निघून गेलेली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यावर ओल्या दुष्काळाचे सावट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतातील पीक हातचे जाणार असल्याने बळीराजा मात्र चांगलाच चिंतातुर झाला आहे. उत्पादनात घट होणार असल्याने सरकारने तातडीने ओळा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाने केली आहे.

मान्सून उशिरा दाखल झाल्याने शेतीच्या कामांना साहजिकच उशिराने सुरुवात झाली. त्यानंतर पावसाने चांगली सुरुवात केल्याने शेतीच्या कामांनी वेग घेतला. जिल्ह्यात तब्बल 95 हजार हेक्टर क्षेत्रावर भाताचे पीक घेतले जाते. पेरणी आणि लावणीची कामे पूर्ण झाली असतानाच पावसाने चांगलाच थैमान घातले आहे. गेल्या 15 दिवसांपासून पावसाने उघडीप दिलेली नाही. त्यामुळे शेतामध्ये सतत पाणी साचून राहात असल्याने पिके कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुरुवातीला काही शेतकऱ्यांनी बियाणे जास्ती घेतले होते. त्यांनी तेदेखील नंतर शेतात टाकले होते, मात्र पावसाने त्यांचेदेखील नुकसान झाले आहे.

सततच्या बरसणाऱ्या पावसामुळे शेतामध्ये सातत्याने पाणी साठत आहे. त्यामुळे पिके कुजण्याची भीती आहे. नव्याने बियाणे खरेदी करुन ते शेतात लावणे अशी शक्यता आता धुसर झाल्याने ओल्या दुष्काळाची शक्यता निर्माण झाली आहे. यावर्षी भाताचे उत्पादन तब्बल 50 टक्क्यांनी घटणार असल्याने शेतकऱ्यांसाठी हा फार मोठा आर्थिक फटका असल्याचे मोठे शहापूरचे शेतकरी अरविंद नाना पाटील यांनी कृषीवलशी बोलताना सांगितले.

सुरुवातीला उशिरा दाखल झालेला पाऊस नंतर जिल्ह्यात चांगलाच सक्रीय झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना सुरुवात केली. पावसाचा जोर सातत्याने वाढत असल्याने बळीराजा मात्र हवालदिल झाला आहे. गेल्या वर्षी जुलै 2022 रोजी 95 टक्के पाऊस पडला होता. आता यावर्षी जुलै महिन्यात तब्बल 164 टक्के पाऊस झाला आहे. म्हणजेच 69 टक्के अधिक पाऊस पडला आहे. त्यामुळे शेतीमध्ये पाणी साचल्याने पिके कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्या काही वर्षांपासून शेतकरी आपल्याच शेतातील बियाणे पुढल्या वर्षीसाठी काढून ठेवत नाही. त्याचा आता कल खरेदी करण्याकडेच राहिलेला आहे. जिल्ह्यात 95 हजार हेक्टरवर भातपिकाची लागवड केली जाते. त्यानुसार सुमारे 45 हजार क्विंटल भाताचे बियाणे लागते. दुबार पेरणी करायची झाल्यास तातडीने एवढे बियाणे उपलब्ध होणार का, असा प्रश्न आहे. परंतु, नवीन बियाणे खरेदी करुन पेरणी, लावणी असे करणे अशी आशा धुसर झाली आहे. कारण शेतकऱ्यांच्या हातातून वेळ निघून गेलेली आहे. त्यामुळे यंदा भाताच्या उत्पादनात 50 टक्क्यांहून अधिक घट होण्याची शक्यता आहे. पावसाची अशीच अवकृपा राहिली तर ते 50 टक्के उत्पादनदेखील हातातून जाऊन जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ सरकारवर येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

पावसाने उघडीप दिल्यानंतर पिकांवर रोग पडण्याची शक्यता अधिक असते. पिकांवर औषध फवारणी करणे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने तो त्या फंदात पडत नाही. त्यामुळे शेतीतील उत्पादन घटणार आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे. याबाबत जिल्हा प्रशासन आणि सरकारला लवकरच पत्र पाठवणार आहे.

राजन भगत, जिल्हा संघटक, श्रमिक मुक्ती दल
Exit mobile version