। खोपोली । प्रतिनिधी ।
आदिवासी वाडीतील युवावर्ग उन्नतीच्या दिशेने होणार्या प्रवाह धारेपासून दुर्लक्षित राहिल्याने त्यांचे होणारे नुकसान रोखण्यासाठी किंबहुना भावी पिढीचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने, लायन्स क्लबने आदिवासीवाडी दत्तक योजना राबवली आहे. आदिवासीवाडी दत्तक योजनेत चेंबूर, वाशी, शहापूर, पेण आणि खोपोली लायन्स क्लबचा समावेश असून त्यांनी जांबरूंग, आत्करगाव, होनाड, शहापूर आणि सावरसर्ई या आदिवासी वाड्याना दत्तक घेतले आहे. लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या डॉ. नरहरी किसन धोटे सभागृहात दत्तक घेतलेंल्या आदिवासी वाड्यातील युवकांसाठी उद्योग, व्यवसाय, नोकरी आणि शैक्षणिक मार्गदर्शन करण्यासाठी 3 ऑक्टोबर रोजी अभ्यास शिबिराचे आयोजन केले होते. महाराष्ट्रातील मान्यवर अशा विचारवंत आणि अभ्यासक विभूतीनी यावेळी युवकांना मार्गदर्शन केले. या अभ्यास वर्गातील युवकांना परिस्थितीनुरूप सर्वतोपरी सहकार्य करण्याचा मानस लायन्स क्लब ऑफ खोपोलीचे अध्यक्ष महेश राठी यांनी बोलून दाखवला. यावेळी शिल्पा मोदी, अल्पेश शहा,दिलीप पोरवाल उपस्थित होते.