कड्यावर अडकलेल्या तीन युवकांचे वाचवले प्राण

| कर्जत | प्रतिनिधी |

कड्यावर अडकलेल्या तीन युवकांचे प्राण वाचविण्यात कर्जत येथील रक्षा संस्थेच्या सदस्यांना यश आले आहे. कर्जत परिसरातील ढाक बहिरी येथे जाण्यासाठी कल्याण येथील शशांक पाटील (17) रा. कल्याण, हर्षल घावटे (17) रा. कल्याण, मोहित नारखेडे, रा. कल्याण तीन युवक कर्जत येथून सांडशी येथे पोहोचले. तिथून पुढे काही काळ पायवाटेवर त्यांनी मार्गक्रमण केले; परंतु काही चढ चढून गेल्यानंतर त्यांना पायवाट सापडली नाही. त्यानंतर त्यांनी एका कातळ कड्यावर चढून वरती जाण्याचा प्रयत्न केला व त्या ठिकाणी ते अडकून पडले.

याबद्दलची माहिती प्रसिद्ध गिर्यारोहक गणेश गीध यांना मिळाली. त्यांनी याबद्दलची माहिती कर्जत येथील रक्षा सामाजिक विकास मंडळ चे कार्यकर्ते अमित गुरव यांना दिली. सदर माहिती बरोबरच त्यांनी या युवकांचे लोकेशन व त्यांचे संपर्क क्रमांक ही गुरव यांना दिले. हे युवक अडकल्याची माहिती मिळताच त्यांचे लोकेशन पाहून रेस्क्यू टीमच्या सदस्यांना तयार राहण्यास कळवले व थोड्याच वेळात सुमित गुरव, राहुल कोनेकर हे सांडशी येथे जाण्यासाठी रवाना झाले.

या तीन युवकांपैकी एक युवक हा कडा चढून वर जाऊन अडकून पडला होता, तर दोन युवक हे कड्याच्या मध्यावर अडकून पडले होते. सर्व परिस्थितीचा अभ्यास करून बचाव पथकाने गिर्यारोहणाच्या साहित्याच्या मदतीने ढाक बहिरी येथील डोंगरामधील अडकलेल्या कड्यावरच्या तीनही युवकांना अतिशय सुरक्षित रित्या पायवाटेवर आणण्यात आले. बचाव पथकातील सुमित गुरव हे गिर्यारोहक असून, रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यामार्फत आपदा मित्र म्हणून कार्यरत आहेत. याचबरोबर त्यांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालय येथून, आपत्ती काळात मदत करण्यासाठी वायरलेस कम्युनिकेशन याचेही प्रशिक्षण घेतले आहे.

Exit mobile version