36 कोटींचा निधी, तरी शाळांच्या इमारतींची दुर्दशा
| रायगड | प्रमोद जाधव |
रायगड जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्तीसाठी विविध योजनांतून तब्बल 36 कोटी 48 लाख रुपयांचा निधी उपलब्ध असतानाही जिल्ह्यातील 1 हजार 938 शाळांच्या इमारतींची दुरुस्ती रखडल्याचे समोर आले आहे. त्यातच 235 इमारती अतिधोकादायक असल्याची बाब उघड झाली आहे. दोन दिवसांपूर्वी धाकटे शहापूर येथील शाळेच्या वर्गखोलीचा स्लॅब कोसळल्याने एका विद्यार्थीनीला गंभीर दुखापत झाली होती. निधी असतानाही दुरुस्ती न झाल्याने ही घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, शाळांच्या इमारतींची दुरवस्था आणि उपलब्ध निधीचा विनियोग याबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
रायगड जिल्हा परिषदेमार्फत पहिली ते आठवीपर्यंतच्या 2 हजार 458 शाळा चालविल्या जातात. या शाळांमध्ये सुमारे 80 हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून, पाच हजार शिक्षक अध्यापनाचे काम करतात. जिल्ह्यातील शाळांच्या एकूण 4 हजार 394 इमारतींमध्ये 7 हजार 994 वर्गखोल्या आहेत. मात्र, या शाळांमधील पायाभूत सुविधांची स्थिती पाहता विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षण मिळत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असले, तरी शाळांच्या इमारतींच्या देखभाल-दुरुस्तीकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी खिडक्या, दरवाजे खराब झाले आहेत, भिंतींना तडे गेले आहेत, तर काही इमारतींच्या स्लॅबची अवस्था चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी वर्गखोल्यांमध्ये बसून शिक्षण घ्यायचे तरी कसे, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
धाकटे शहापूर येथील शाळेत सुमारे 15 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या दोन वर्गखोल्यांचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली. या बांधकामासाठी सुमारे 10 लाख रुपये खर्च झाल्याचा अंदाज शिक्षण विभागाकडून व्यक्त करण्यात आल्याचे सांगितले जाते. या घटनेनंतर शाळांच्या बांधकामाचा दर्जा, देखभाल आणि नियमित तपासणी याबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
जिल्ह्यातील 1 हजार 938 इमारतींची दुरुस्ती अद्याप प्रलंबित असल्याने या इमारतींमध्ये शिक्षण घेणाऱ्या अंदाजे 20 हजार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल पालकांकडून केला जात आहे. शाळांच्या इमारती आणि वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी विविध स्रोतांतून निधी उपलब्ध असल्याची माहिती आहे. त्यामध्ये जिल्हा परिषद सेस फंडातून 4 कोटी 60 लाख रुपये, जिल्हा नियोजन समितीकडून 26 कोटी 50 लाख रुपये, पंधराव्या वित्त आयोगातून 4 कोटी 58 लाख रुपये, तर समग्र शिक्षा अभियान व इतर उपक्रमांतून 79 लाख रुपये उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे. इतका निधी उपलब्ध असतानाही शाळांच्या दुरुस्तीची कामे प्रलंबित का आहेत? कोणत्या शाळांच्या दुरुस्तीला मंजुरी मिळाली? किती कामे सुरू झाली आणि किती कामांसाठी निधी खर्च झाला? दुरुस्तीची कामे रखडण्यामागे प्रशासकीय दिरंगाई आहे की निधीच्या वितरणातील अडचणी, याचा खुलासा होणे आवश्यक आहे.
235 इमारतींसाठी 53 कोटींची गरज
जिल्ह्यातील 235 शाळांच्या इमारती अतिधोकादायक स्थितीत असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. या इमारती पूर्णपणे जीर्ण झाल्याने काही ठिकाणी विद्यार्थ्यांना समाजमंदिर किंवा अन्य पर्यायी ठिकाणी बसवून शिक्षण द्यावे लागत असल्याचे सांगण्यात येते. या इमारतींची पुनर्बांधणी आणि आवश्यक वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यासाठी अतिरिक्त निधीची गरज आहे. त्यासाठी सुमारे 53 कोटी रुपयांचा निधी आवश्यक असल्याची माहिती समोर आली आहे.
पालकमंत्री, आमदारांचे दुर्लक्ष
पालकमंत्र्यांच्या तालुक्यातील 32, तर आमदार महेंद्र थोरवे यांच्या कर्जत तालुक्यातील 34 शाळांच्या इमारती अतिधोकादायक असल्याची आकडेवारी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळांच्या पायाभूत सुविधांचा प्रश्न केवळ ग्रामीण भागापुरता मर्यादित नसून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर विषय बनला आहे.
निधी गेला कुठे?
शाळांची दुरुस्ती ही केवळ प्रशासकीय कामाची बाब नाही, तर हजारो विद्यार्थ्यांच्या जीविताशी निगडित जबाबदारी आहे. त्यामुळे धोकादायक इमारतींचे तातडीने संरचनात्मक परीक्षण, आवश्यक दुरुस्ती आणि पुनर्बांधणी, तसेच उपलब्ध निधीच्या वापराचा पारदर्शक तपशील जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे. जिल्हा परिषद प्रशासन आणि शिक्षण विभाग या प्रश्नावर कोणती ठोस भूमिका घेणार, याकडे पालक, शिक्षक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.
शाळांच्या इमारतीवर दृष्टीक्षेप
इमारतींची सद्यस्थिती - संख्या
उत्तम इमारत - 2221
किरकोळ दुरुस्ती - 986
मोठी दुरुस्ती - 952
नव्याने बांधकाम करणे - 235
एकूण - 4394
अतिधोकादायक इमारतींवर दृष्टीक्षेप
तालुके - इमारत संख्या
अलिबाग - 10
कर्जत -34,
खालापूर - 9
महाड - 32
माणगाव- 12
म्हसळा - 16
मुरूड - 6
पनवेल - 18
पेण - 20
पोलादपूर - 18
रोहा - 18
श्रीवर्धन - 11
सुधागड - 8
तळा - 18
उरण - 5
एकूण - 235
