| बारामती | प्रतिनिधी |
गेल्या 25 ते 30 वर्षांपासून भू विकास बँकेने दिलेल्या कर्जांची वसुलीच झालेली नाही. ही वसुली होणार नाही, हे कळल्यानंतर राज्य सरकारने घोषणा केली की, आम्ही भू विकास बँकेतील शेतकर्यांची कर्जे माफ करत आहोत. लबाडाच्या घरचं आवताण जरी असलं तरी जेवल्याशिवाय खरं नसतं, असा हा एकंदरित प्रकार असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले.
भू विकास बँकेच्या कर्जमाफीबाबत शिंदे-फडणवीस सरकारकडून केला जाणारा दावा हा पूर्णपणे फसवा असल्याचा आरोपही पवार यांनी केला. आम्ही भू विकास बँकेतील शेतकर्यांचे कर्ज माफ केले, असे राज्य सरकारकडून सांगितले जाते. पण मला इथे बसलेल्या लोकांनी सांगावं की, गेल्या 10 वर्षांमध्ये किमान एका शेतकर्याला तरी भू विकास बँकेचे कर्ज मिळाले आहे का? भू विकास बँक अस्तित्त्वात आहे, ही गोष्ट तरी तुम्हाला माहिती आहे का? भू विकास बँक एकेकाळी होती, पण आता ती राज्यात कार्यरत नाही. आता भू विकास बँकेचे नावही कोणाला माहिती नाही.
यावर आता भाजप आणि शिंदे गटाकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.