लोकलचा प्रवास डोंगर रांगांतून होणार

पनवेल-कर्जत कॉरिडॉर प्रकल्प अंतिम टप्प्यात

| पनवेल | प्रतिनिधी |

नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्याला थेट उपनगरी रेल्वेची जोड देणाऱ्या पनवेल-कर्जत उपनगरी रेल्वे कॉरिडॉरचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पाचे सुमारे 95 टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम वेगाने सुरू आहे. मात्र, संपूर्ण प्रकल्पात सर्वाधिक लक्ष वेधणारा आणि तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाचा भाग म्हणजे सह्याद्रीच्या डोंगररांगांतून उभारण्यात आलेले तीन रेल्वे बोगदे. डोंगराळ आणि खडकाळ भाग भेदत उभारण्यात आलेल्या या बोगद्यांमुळे उपनगरी रेल्वे मार्ग उभारण्याचे मोठे अभियांत्रिकी आव्हान यशस्वीरीत्या पेलले गेले आहे. हे काममार्च 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

मुंबई रेल विकास महामंडळामार्फत मुंबई अर्बन ट्रान्स्पोर्ट प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत (एमयूटीपी-3) हा मार्ग उभारण्यात येत आहे. पनवेल ते कर्जत दरम्यान 29.6 किलोमीटर लांबीचा दुहेरी रेल्वेमार्ग तयार केला जात असून, या प्रकल्पासाठी सुमारे 2,783 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. डोंगराळ आणि वनक्षेत्रातून मार्ग जात असल्याने प्रकल्पाच्या कामात अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला.

डोंगररांगांतून तीन बोगदे
सह्याद्रीच्या डोंगराळ भागातून मार्ग काढताना या प्रकल्पात एकूण तीन बोगदे उभारण्यात आले आहेत. या बोगद्यांची एकत्रित लांबी सुमारे 3,206 मीटर आहे. त्यापैकी वावरले येथील 2.639 किलोमीटर लांबीचा बोगदा हा सर्वात मोठा असून मुंबई उपनगरी मार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा म्हणून ओळखला जात आहे. या बोगद्यांची उभारणी आधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करण्यात आली आहे.विशेष म्हणजे, बोगद्यातून जाणाऱ्या रेल्वे रुळांसाठी पारंपरिक खडीऐवजी खडीविरहित (बॅलेस्टलेस) ट्रॅक प्रणाली बसविण्यात येत आहे. त्यामुळे गाड्यांचा प्रवास अधिक स्थिर, सुरक्षित आणि कमी कंपनाचा होणार आहे. तसेच ट्रॅकची देखभालही तुलनेने कमी लागणार आहे.

या बोगद्यांमध्ये प्रकाश व्यवस्था, वायुवीजन प्रणाली आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. या आधुनिक सुविधांमुळे बोगद्यांमधून गाड्यांची वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत होणार आहे. पनवेल-कर्जत कॉरिडॉरमध्ये उभारण्यात आलेले हे तीन बोगदे प्रकल्पाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरले असून, संपूर्ण मार्गाच्या कामाला त्यामुळे गती मिळाली आहे. हा कॉरिडॉर सुरू झाल्यानंतर नवी मुंबई आणि रायगड परिसरातील प्रवाशांना उपनगरी रेल्वेचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. मार्ग उभारताना डोंगराळ भूभागामुळे तीन बोगदे तयार करणे, हे मोठे अभियांत्रिकी आव्हान होते. खडकाळ रचना आणि पाण्याची झिरपण यामुळे काम कठीण झाले होते; मात्र आधुनिक तंत्रज्ञान आणि नियोजनाच्या मदतीने हे बोगदे यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत.

योगेश शर्मा,
प्रकल्प व्यवस्थापक, एमआरव्हीसी.
Exit mobile version