दिघी गावात रुग्णांची हेळसांड

डॉक्टरविना आरोग्य उपकेंद्र असल्याने अडचण
कुलूपबंद दिघी आरोग्य केंद्र बनले शोभेची वस्तू

| दिघी । वार्ताहर |

श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन प्रा. आरोग्य केंद्रांतंर्गत दिघी गावात उपकेंद्र आहे. या उपकेंद्रात औद्योगिक क्षेत्रातील कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) डॉक्टरांची सुविधा देण्यात आली. मात्र, आता या कुलूपबंद रुग्णालयात सुविधा मिळत नसल्याने सर्वसामान्यांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे.

ग्रामीण भागातील सामान्य व्यक्तींपर्यंत आरोग्य सुविधा पोचवण्यासाठी सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करून आरोग्य केंद्रांच्या इमारती उभ्या केल्या आहेत. अधिकारी आणि कर्मचारी यांना लाखो रुपयांचे पॅकेज देऊन अशा ठिकाणी नियुक्त्याही दिल्या जातात. त्यांना राहण्यासाठी सरकारी घरंसुद्धा बांधून दिली आहेत. मात्र, असे असतानाही ग्रामीण भागातील नागरिकांना खाजगी दवाखान्यांच्या दारात जावं लागतं, आणि भरमसाठा खर्चही करावा लागतोय. कारण याच शासकीय रुग्णालयांची दार कुलूपबंद आहेत.

बोर्लीपंचतन प्रा. आरोग्य केंद्रांतंर्गत असलेल्या दिघी उपकेंद्राअंतर्गत कुडगाव, तुरुंबाडी, रोहिणी, हरवित, सर्वा, दिघी, करलास, नानवली, मनेरीसह अनेक गावांचा व आदिवासी वाड्यांचा समावेश होतो. येथे सीएसआर माध्यमातून डॉक्टर देण्यात आले. मात्र, काही दिवसातच ही सुविधा बंद झाल्याने, सध्या उष्माघातापासून ताप, सर्दी, खोकला अशा आजारांनी रुग्णांचे हाल होत आहेत. अशा प्रसंगी उपकेंद्र बंद असल्याने जनसामान्यांनी काय करावे हा प्रश्‍न आहे.

येथील दिघी गावकर्‍यांचा प्रमुख व्यवसाय मच्छीमार आहे. याच परिसरात औद्योगिक क्षेत्राची मोठी उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे छोट्या-मोठया अपघाताच्या घटना घडतच असतात. मात्र, दिघीतील आरोग्य उपकेंद्र मागील दीड महिन्यापासून एकही दिवस उघडले नाही. त्यामुळे गावात आरोग्य उपकेंद्र असूनही गावकर्‍यांना खाजगी हॉस्पिटलमध्येच उपचारासाठी जावे लागते. इथे आरोग्य कर्मचारी येतच नाहीत अशी तक्रार इथल्या गावकर्‍यांनी केली आहे.

आरोग्य उपकेंद्राचे उद्दिष्ट

शासनाच्या आरोग्य विभागाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीप्रमाणे आरोग्य उपकेंद्रामार्फत प्रथमोपचार, प्रसुतीपूर्व मातांची तपासणी व किरकोळ आजारावर औषधोपचार, कुटुंब कल्याण, माता बाल संगोपन विषयक सल्ला व सेवा या बरोबरच क्षयरोग, कुष्ठरोग व हिवतापाच्या रुग्णांना उपचार व संदर्भ सेवा, आरोग्य शिक्षण इत्यादी सेवा पुरविण्यात येतात. प्रत्येक उपकेंद्रामध्ये एक आरोग्य सेवक (पुरुष) व एक (स्त्री) तसेच एक अंशकालीन स्त्री परिचरीका अशा एकूण 3 पदांना शासनाने मान्यता दिली आहे.

दिघी हे उपकेंद्र या परिसरात एकच वैद्यकीय उपचारांचा आधार आहे. अन्यथा थेट खाजगी वाहनाने बारा ते तीस किलोमीटरवर किंवा त्या पलीकडे पन्नास किलोमीरचे अंतर कापत माणगाव येथील सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात जावे लागते. येथे दीड महिन्यापूर्वी रुग्णालय बंद झाले व त्यानंतर कुणी फिरकलाच नाही. दरदिवशी 2-4 तास डॉक्टर आले तर स्थानिकांना खूप फायदा होऊ शकेल.

हरिश्‍चंद्र भालदार,
दिघी रहिवासी

Exit mobile version