माथेरानच्या मुख्य रस्त्याचे विद्रुपीकरण

पत्र्याच्या कंपाऊंडचा रहदारीला अडथळा

। माथेरान । वार्ताहर ।

माथेरानची मुख्य रस्त्यावरील बाजारपेठ खूपच सुटसुटीत आणि ऐसपैस आहे. परंतु, याठिकाणी असणार्‍या रस्त्यालगत मस्जिद तसेच हॉटेल अलंकार यांनी त्यांच्या जागे व्यतिरिक्त नगरपरिषदेच्या जागेतील रस्त्यावरच पत्र्याचे कंपाऊंड केले आहे. मुळात रस्त्याला कमी जागा असताना या कंपाऊंडमुळे रस्ता खूपच अरुंद झाला आहे. मस्जिद तसेच हॉटेल अलंकार यांनी त्यांच्या दगडी कंपाऊंडला लागून पत्र्याचे बांधकाम केले असते तर काही अडचणी निर्माण झाल्या नसत्या. परंतु, नगरपरिषदेच्या गटारावर अगदी रस्त्यालगत पत्र्याचे कंपाउंड केल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच, या गटारात पडणारा कचरा नगरपरिषदेच्या कामगारांना, घनकचरा व्यवस्थापन कामगारांना गोळा करता येत नाही. तसेच, या गटारांवर स्थानिक भूमिपुत्रांना छोट्या टपर्‍या बांधण्यास दिल्या तर याच माध्यमातून नगरपरिषदेला भाड्यापोटी उत्पन्न प्राप्त होऊ शकते. आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होऊ शकतात. अशाप्रकारे संबंधितांनी अनधिकृतपणे कंपाऊंड केल्यामुळे मुख्य बाजारपेठेत एकप्रकारे विद्रुपीकरण दिसत आहे. नगरपरिषदेच्या अधिकारी वर्गाने हे कंपाऊंड बांधण्यात आले त्यावेळी दुर्लक्ष का केले, याबाबत सुध्दा तर्कवितर्क लढविले जात आहेत. यामुळे लवकरच सदरचे विद्रुपीकरण काढून टाकावे, अशी स्थानिकांमधून मागणी केली जात आहे.

Exit mobile version