रेडिमेड गुढीला नागरिकांची पसंती
120 ते 200 रुपयांमध्ये उपलब्ध
| चिरनेर | वार्ताहर |
मराठी वर्षातील पहिला सण म्हणून गुढीपाडवा चैत्र महिन्यात साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला गुढीपाडवा आनंद आणि मांगल्याचे प्रतीक आहे. गुढीपाडव्यानिमित्त घरोघरी गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करण्यात येते. त्यानिमित्त बाजारपेठा फुलून गेल्या असून, आकाराला लहान व दिसायला सुंदर असलेल्या रेडीमेड गुढीला ग्राहकांची पसंती मिळत आहे.
गुढीसाठी लागणार्या नव्या काठीसह रेशमी-तलम वस्त्र, लहान तांब्या, कृत्रिम फुलांचा हार, पाने, माळा आणि साखरगाठींची खरेदी सुरू झाली आहे. पारंपरिक सजावट केलेल्या नावीन्यपूर्ण रंगीबेरंगी रेडीमेड गुढीविक्रीसाठी उपलब्ध असून साहित्याची खरेदी करण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी बाजारात दिसून येत आहे. लहान, पण दिसायला सुंदर असलेल्या रेडीमेड गुढीला ग्राहकांची जास्त पसंती आहे. दुसरीकडे शोभायात्रांचीही जल्लोषात तयारी सुरू झाली आहे.
साधारण नऊ इंचाची रेडीमेड गुढी 80 ते 100 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. एक फुटाची गुढी 120 ते 150 रुपयांना मिळत आहे. दीड फुटाच्या गुढीची किंमत 200 ते 250 रुपये आहे. सजवलेल्या गुढी दर्जा व आकारानुसार 700 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. गुढीच्या काठीवर साखरगाठीचा हार घालण्यात येत असल्याने त्यांना अधिक महत्त्व असते. साखरगाठींच्या हारांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. गुढीची साडीही रेडिमेड गुढी उभी करताना साडी, भरजरी ब्लाऊज पीसचा वापर करतात. साडीचा वापर करताना तिची व्यवस्थित घडी घालणे आवश्यक असते. गडबडीच्या वेळी वेळ वाचवणारी तसेच गुढीला शोभणारी डिझायनर गुढीची साडी सध्या बाजारात उपलब्ध आहे. त्यामुळे नोकरदारवर्गाची रेडीमेड गुढीला अधिक पसंती मिळत असून, बाजारातदेखील विविध पर्याय उपलब्ध आहेत. उरण बाजारात ठिकठिकाणी रेडीमेड गुढी दाखल झाल्या आहेत.
आनंद, विजय, स्वागताचे प्रतीक असलेल्या गुढीपाढव्याला बांबूपासून उभारलेली गुढी तयार केली जाते. धावपळीच्या काळात बांबूची गुढी उभारण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने रेडिमेड गुढीला अधिक मागणी आहे. नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या आनंदाने उत्साहात केले जाणार आहे.
– रजनी मानापुरे, सामाजिक कार्यकर्त्या, केगाव-पाल्याची वाडी
पाट आणि त्यावर असलेले नक्षीदार कापड, नारळ, तांब्या, आंब्याची पाने, गुढीभोवती असलेले कापड, हार इत्यादी सर्व साहित्याचा समावेश रेडिमेड गुढीमध्येही पहावयास मिळतो. त्यामुळे नोकरदारवर्गाचा रेडिमेड गुढी घेण्याकडे कल आहे. विविध आकाराच्या गुढ्या बाजारात उपलब्ध आहेत. यंदा 10 ते 20 रुपयांनी गुढ्यांच्या किमतीत वाढ झाली असून, कॉटनच्या साडी प्रकारात उपलब्ध असलेल्या गुढीला महिलावर्गाची मोठी पसंती मिळते आहे.
– यश मेहता, विक्रेता, उरण