बदलीपात्र शिक्षक आंदोलनाच्या पवित्र्यात
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अवघड आणि दुर्गम भागात बदली झालेल्या महिला आणि ज्येष्ठ शिक्षकांनी बुधवारी रायगड जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांची भेट घेतली. परंतु या भेटीतून कुठलाही सन्मान्य तोडगा निघाला नाही. त्यामुळे या बदलीपात्र शिक्षकांची नाराजी वाढली असून त्यांनी यासंदर्भात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
शिक्षकांच्या ऑनलाइन बदली प्रक्रियेतील सहाव्या टप्प्यात वयाची पन्नाशी ओलांडलेल्या शिक्षकांना दुर्गम भागातील शाळा मिळाली आहे. यातील बहुतांश महिला असून अनेकजण व्याधीग्रस्त आहेत. या पक्रियेत आपल्यावर अन्याय झाला, अशी त्यांची भावना आहे. या शिक्षकांनी या विरोधात न्यायालयात धाव घेतली असतानाच बुधवारी हे सर्व शिक्षक अलिबागेत एकत्र आले. त्यांनी जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांची भेट घेवून यावर चर्चा केली आणि बदली प्रक्रियेतील सहावा टप्पा रद्द करावा, अशी मागणी केली.
यावर किरण पाटील यांनी ही बदली प्रक्रिया शासनाने ठरवून दिलेल्या निर्णयानुसारच झाल्या आहेत. त्यामुळे यात बदल करण्याचा आम्हाला कुठलाच अधिकार नसल्याचे स्पष्ट केले. नव्याने भरती होणाऱ्या शिक्षकांना दुर्गम शाळांमध्ये पाठवून ज्येष्ठ व महिला शिक्षकांना सुगम शाळांचे पर्याय खुले करावेत, असा पर्याय शिक्षकांनी ठेवला असता यावर शासनच निर्णय घेवू शकते, असे किरण पाटील यांनी सांगितले. यामुळे निराश झालेल्या शिक्षकांनी अलिबागमध्ये बैठक घेतली. ही बदली प्रक्रिया अन्यायकारक असून त्याविरोधात लढा देण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. लवकरच याबाबत वरिष्ठ स्तरावरील अधिकारी, मंत्री यांची भेट घेवून प्रयत्न केला जाईल त्यानंतरही सर्वमान्य तोडगा निघाला नाही तर आंदोलनाचे अस्त्र उपसण्याचा निर्णय घेण्यात आला. बदलीपात्र शिक्षकांच्या या भूमिकेला सर्व शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला असून या लढाईत आम्ही आपल्या सोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. महिला आणि ज्येष्ठ शिक्षकांची बदली दुर्गम ठिकाणी करणे अन्यायकारक असून त्यांची समुपदेशनाने बदली करावी, असा आग्रह शिक्षक संघटनांनी धरला आहे.