जयंत पाटील यांच्याकडून श्रद्धांजली अपर्ण
| कोल्हापूर | प्रतिनिधी |
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार सतेज (बंटी) पाटील यांचे वडील डॉ. डी.वाय. पाटील यांच्या निधनानंतर शेकापचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांनी पाटील कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी दिवंगत डॉ. डी.वाय. पाटील यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
डॉ. डी.वाय. पाटील यांनी गरीब, गरजू आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी शेकडो शाळा व महाविद्यालयांची उभारणी करून शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले. शैक्षणिक संस्था उभारणीसाठी त्यांनी घेतलेला पुढाकार आणि शिक्षण क्षेत्रातील भरीव कार्यामुळे त्यांना ‘शिक्षणसम्राट’ म्हणून आदराने संबोधले जात होते. काही दिवसांपूर्वी डॉ. डी.वाय. पाटील यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर आमदार सतेज (बंटी) पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन जयंत पाटील यांनी पाटील कुटुंबियांचे सांत्वन केले. या दुःखद प्रसंगी पाटील कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत त्यांनी डॉ. डी.वाय. पाटील यांच्या कार्याचे स्मरण केले. शिक्षण क्षेत्रात डॉ. डी.वाय. पाटील यांनी उभे केलेले कार्य आणि त्यांनी दिलेले योगदान सदैव प्रेरणादायी राहील. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील तसेच पाटील कुटुंबियांचे इतर स्नेही उपस्थित होते.
