मुरुड आगाराचा भोंगळ कारभार

| कोर्लई | प्रतिनिधी |

मुरुड आगाराच्या बस वारंवार रस्त्यात बंद पडणे, ब्रेक निकामी होणे अशा प्रकारांमुळे प्रवासी आणि वाहनचालकांची डोकेदुखी वाढली आहे. बसच्या देखभालीबाबत मुरुड आगाराच्या भोंगळ कारभारावर प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मुरुड आगारातून सकाळी 8.30 वाजता सुपेगाव मार्गे रोह्याकडे जाणारी बस विहूरपर्यंत पोहोचण्याआधीच पाईप लिकेजमुळे बंद पडली. तर शुक्रवारी, 27 नोव्हेंबर रोजी सकाळी केळघरहून मुरुडकडे येणाऱ्या बसचे गारंबी येथील अवघड वळणावर अचानक ब्रेक निकामी झाले. या ठिकाणी यापूर्वीही अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील प्रवासी आणि विद्यार्थ्यांचा जीव वाचला. त्या दिवशी संकष्टी चतुर्थी असल्याने गणपती बाप्पाच्या कृपेने मोठे संकट टळल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली. मुरुड आगारासाठी सुसज्ज आणि सुरक्षित बस उपलब्ध करून देण्याबरोबरच बसची नियमित देखभाल करण्याकडे राज्य परिवहन महामंडळाच्या प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

Exit mobile version