मेघ बरसले…पण तूट शंभरीपार!

मुरूडमध्ये सर्वाधिक, तर पनवेलसह सात तालुक्यांत कमी पाऊस; बळीराजाला दिलासा

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

दिर्घ प्रतीक्षेनंतर अखेर सोमवारी (दि. 22) रायगड जिल्ह्यात मान्सूनने दमदार हजेरी लावली. जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसह बळीराजालाही मोठा दिलासा मिळाला. दिवसभर अधूनमधून झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून खरीप हंगामाच्या कामांनाही वेग येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात सोमवारी सरासरी 11.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तालुकानिहाय आकडेवारीनुसार, मुरूड तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला. त्याखालोखाल अलिबाग, पोलादपूर, महाड, उरण आणि रोहा तालुक्यांमध्येही समाधानकारक पावसाची नोंद झाली. तर पनवेल, कर्जत, पेण, सुधागड, माणगाव, श्रीवर्धन आणि म्हसळा या तालुक्यांमध्ये तुलनेने कमी पाऊस पडला.

जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक चिंतेत होते. मात्र, सोमवारी झालेल्या पावसामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना चालना मिळणार असून, पाणीसाठ्यांमध्येही काही प्रमाणात वाढ होण्याची अपेक्षा आहे. असे असले तरी, यंदाच्या मान्सूनची सुरुवात अद्यापही समाधानकारक म्हणता येणार नाही. जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पावसाची तुलना गतवर्षीच्या याच कालावधीशी केली असता जवळपास शंभर टक्के तूट असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यात पडणारा पाऊस लांबणीवर गेल्यामुळे तापमानात प्रचंड वाढ झाली होती. त्यामुळे उकाड्याने नागरिक त्रस्त झाले होते. धरण, विहीरी व तलावांमधील पाण्याच्या पातळीतही मोठी घट झाली. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये 17.67 टक्के इतकाच जलसाठा शिल्लक राहिला असून, पाणी संकट निर्माण झाले. तसेच, शेतकरी पेरणीसाठी सज्ज झाले होते. मात्र, पावसाअभावी भात शेती अडचणीत सापडली होती. कृषी विभागाने पेरणी करू नका, असा सल्ला शेतकऱ्यांना दिला होता. ज्या शेतकऱ्यांनी धुळपेरणी केली होती, त्यांना भात रोपे जगविण्यासाठी विहीरीच्या पाण्याची मदत घ्यावी लागली होती. त्यामुळे नागरिकांसह बळीराजाचे आकाशाकडे डोळे लागले होते. अखेर सोमवारी (दि.22) सकाळी पहाटेच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. यावेळी पाऊस जोरदार कोसळल्याने हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांसह शेकतऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला.

गतवर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने सुरुवात केली होती. त्यावेळी दि.22 जून, 2025 पर्यंत 522 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली होती. म्हणजेच एकूण 108 टक्के पाऊस पडला होता. यावेळी पंधरा दिवसांच्या दिर्घ प्रतिक्षेनंतर रायगड जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावली. एका दिवसात 11.4 मि. मी. इतका पाऊस पडला. दि.22 जूनपर्यंत 22.3 मि.मी. इतक्या पावसाची नोंद आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेने पाऊस फारस कमी पडल्याचे आकडेवारीनुसार दिसून येत आहे.

पाणी संकट कायम
रायगड पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित 28 धरणे आहेत. त्यामध्ये अलिबाग तालुक्यातील अलिबाग, मुरुड, तळा, पेण, उरण व रोहा या तालुक्यात प्रत्येकी एक धरण आहे. तर, सुधागडमध्ये पाच, श्रीवर्धनमध्ये तीन, म्हसळामध्ये दोन, महाडमध्ये चार, कर्जतमध्ये दोन, खालापूरमध्ये तीन व उरणमध्ये तीन धरणांचा समावेश आहे. त्यातील फणसाड व कोथुर्डे धरणात शुन्य टक्के, ढोकशेत व बामणोलीत दोन टक्के, उन्हेरे व घोटवडेमध्ये चार टक्के, रानवली, उसरण व पाभरेमध्ये सहा टक्के, डोणवतमध्ये दहा टक्के, कवेळे व श्रीगावमध्ये अकरा टक्के, कोंडगाव, अवसरे, साळोख, कलोते- मोकाशी व खैरेमध्ये 15 ते 18 टक्के, तसेच अन्य धरणांमध्ये 22 ते 48 टक्के इतका जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाऊस पडला असला, तरी जिल्ह्यामध्ये पाणी संकट कायमच आहे.
पडलेल्या पावसावर दृष्टीक्षेप
अलिबाग - 28.2 मि.मी.
पनवेल - 0.3 मि.मी.
कर्जत - 0.5 मि.मी.
खालापूर - 1.2 मि.मी.
उरण - 15.1 मि.मी.
सुधागड - 7.5 मि.मी.
पेण - 0.1 मि.मी.
महाड - 16.8 मि.मी.
माणगाव - 6.5 मि.मी.
रोहा - 15.7 मि.मी.
पोलादपूर - 25.0 मि.मी.
मुरुड - 46.8 मि.मी.
श्रीवर्धन - 6.5 मि.मी.
म्हसळा - 9.2 मि.मी.
तळा - 8.3 मि.मी.
एकूण - 11.4 मि.मी.
Exit mobile version