मोरबे धरण तुडुंब भरले, दोन दरवाजे उघडले

नवी मुंबईकरांंसह पनवेलकरांची पाण्याची चिंता मिटली


| रसायनी | वार्ताहर |

नवी मुंबई महानगरपालिका पुर्ण क्षेत्र आणि पनवेल महानगरपालिका मधील खारघर, कामोठे विभागाला पाणी पुरवठा करणारे मोरबे धरण पुर्ण क्षमतेने भरले आहे. मध्यरात्री धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात येऊन पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. धरण भरल्याने नवी मुंबई करांंसह पनवेलकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सर्वांचिच चिंता वाढली होती. त्यानंतर शुक्रवार आणि शनिवार असा सलग दोन दिवस पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. सतत बरसणाऱ्या पावसामुळे मोरबे धरणातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे भविष्यातील पाण्याची समस्या मिटली आहे.

रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठे आणि फक्त पाणी पुरवठा करणारे मोरबे धरण आहे. सदरचे धरण हे नवी मुंबई महानगरपालीकेच्या मालकीचे आहे. मोरबे धरण हे खालापूर तालुक्यात माथेरान डोंगराच्या पायथ्याशी आहे. या धरणातून नवी मुंबई महानगरपालिका यांच्या पुर्ण विभागात आणि पनवेल महानगरपालिका यांच्या कार्यक्षेत्रातील खारघर आणि कामोठे विभागाला पाणी पुरवठा करणारे मोरबे धरण पुर्ण क्षमतेने भरले आहे. रविवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास धरणाचे दोन्ही दरवाजे 15 सेंटीमीटर ने उघडण्यात आले आहेत. सेकंदाला 19 घ.मी. पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

मोरबे धरणाची पाणी साठवण क्षमता 190.890 द. ल. घ. मी.एवढी आहे. नवी मुंबई महानगरपालिका,कामोठे आणि खारघर येथील नागरीक वसाहती साठी दररोज 470 एमएलडी पाणी सोडले जाते. मोरबे धरणाची उंची 88 मीटर आहे. सतत दोन दिवस जोरदार पडलेल्या पावसामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. जोरदार पाऊस सुरू असल्याने धावरी नदी काठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. कुणीही नदी काठावर जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्या होत्या. धावरी नदीवरील गणपती बाप्पाला निरोप देण्याचा कार्यक्रम पूर्ण झाल्याची खात्री मोरबे धरण प्रशासनाने केल्यावर मध्यरात्री दोन्ही दरवाजे 15 सेंटीमीटरने वर करण्यात आले. त्याआधी जलपूजन करण्यात आले. यावेळी उप अभियंता पडघन, कनिष्ठ अभियंता मोरे यांच्यासह माजी सरपंच सचिन मते, मोरबे धरण, नवी मुंबई महानगर पालिका पाणीपुरवठा कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version