साक्षात भोराई देवीचा आशिर्वाद लाभलेली गडावरच्या मोरे आईने आज दुपारी शेवटचा श्वास घेतला

अलिबाग | शहर प्रतिनिधी |

सगळेच देव आभाळात नसतात म्हणून त्याने जमिनीवर आई निर्माण केली….रात्री अपरात्री कधीही गडावर गेले तरी झोपडीतून माऊलीचा आवाज यायाचा , “चहा ” ठेवते या…गेली ३०-३५ वर्षे तिने गडावर येणाऱ्या प्रत्येक भटक्यांची सेवा केली,झोपडीत असेल नसेल, वा काहीही असेल तर ताटात समोर यायचं, तिने तिचं आयुष्य गडावर घालवलं, सुधागडाचा आधार आज हरपला.

गडावर होणाऱ्या प्रत्येक श्रमदानाची ती साक्षीदार आहे, गडावर शिवमंदिर उभारण्यापासून ते गडावर महाद्वार पर्यंत सगळी कामे ती कसोशीने पाहायची. खूप हायस वाटायचं तिला आम्हा सर्वांचं…काटक शरीर असल्याने भल्या भल्या तरुणांना लाजवेल अशा वेगाने ती गड चढ-उतार करायची… येणाऱ्या वाटसरुला थरथरत्या हाताने गोल-गोल भाकरी करुन घालायची आणि मुक्या जीवांना लळा लावायची. कसलीही अपेक्षा न ठेवता गुरं ढोरं साभाळत व आम्हा सारख्या असंख्य भटक्यांची भूक भागवत तिने आपलं आयुष्य गडावर घालवल. सुधागडाचा चिरा-न चिरा तिच्या स्पर्शाचा तिच्या मायेचा साक्षीदार आहे.

खूप सार्या सुखद आठवणी आहेत,पण गडावर गेल्यावर आता भकास वाटणार एवढं नक्कीच!

Exit mobile version