| उरण । वार्ताहर ।
द्रोणागिरी गडावर दोन टन वजनाची शिवकालीन तोफ विराजमान करण्यास शिवप्रेमींना दोन मोहिमेत यश आले आहे. तोफ गडावर नेताच शिवप्रेमींनी हर हर महादेव, जय शिवाजी असा जयघोष करून परिसर दणाणून सोडला.
शिवकालीन असलेली तोफ गडाच्याखाली खाली मातीखाली गाडली होती. खोदकाम करीत असताना सदर तोफ सापडली होती. शिवप्रेमींनी ती गडावर नेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या प्रयत्नाला यश येत त्यासाठी रविवार दि. 11 डिसेंबर रोजीचा मुहूर्त घेत सुरुवात केली. या मोहिमेत अनेक शिवप्रेमी सामाजिक संघटना व शिवप्रेमी मोठ्या संख्येने सामील झाले होते. वाट अवघड असतानाही शिवप्रेमींनी आपल्या जिद्दीच्या जोरावर सायंकाळ पर्यंत डोंगराच्या मध्यभागी नेण्यात शिवप्रेमींना यश आले. अंधार पडल्याने मोहीम थांबविण्यात आली होती.
रविवार दि. 25 डिसेंबर रोजी पहाटे पाच वाजता पुन्हा शिवप्रेमींनी हर हर महादेव, जय शिवाजी यांच्या जयघोषात मोहीम सुरू केली.यावेळी शिवप्रेमींच्या चेहरे आनंदाने फुलले होते. लवकरच ही शिवकालीन तोफ द्रोणागिरी गडावर सुस्थितीत विराजमान केली जाणार आहे.