बिबट्याच्या तावडीतून आईने बाळाला वाचवले

| पुणे | वृत्तसंस्था |

जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे फुटाणे मळा येथे धनगर समाजातील सात महिन्याच्या मुलावर बिबट्याने बुधवारी पहाटेच्या सुमारास हल्ला केला. मात्र मुलाच्या आईने पोटच्या गोळ्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढत त्याचे प्राण वाचवले. या घटनेनंतर महिलेच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

सुखदेव फुटाणे यांच्या शेतात एक वाडा आहे. मेंढपाळ धोंडीभाऊ करगळ यांची पत्नी सोनल करगळ ही तिच्या सात महिन्याचा मुलगा देवा याला घेऊन त्या वाड्याच्या शेजारी झोपली होती. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने मुलाचा हात तोंडात धरत ओढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सोनल करगळ यांना जागा आली. बिबट्या मुलाला ओढत असताना सोनल यांनी बघितले. त्यावेळी त्यांनी एका हाताने मुलाला ओढत प्रतिकार सुरू केला आणि मुलाला बिबट्याच्या जबड्यातून बाहेर काढले. जोरजोरात आरडा-ओरडा केला. त्यावेळी तिच्या कुटुंबातील सदस्य बाहेर आले आणि त्यानंतर बिबट्या पळून गेला.

Exit mobile version