आगामी पिढ्यांसाठी मातृभाषेचे जतन गरजेचे

बळवंत वालेकर यांचे प्रतिपादन
प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालयात मराठी भाषा गौरव दिन

। अलिबाग । वार्ताहर ।
मराठी भाषिक निजभाषेपासून लांब जाण्याची खंत व्यक्त करत, आगामी पिढ्यांसाठी आपल्या मातृभाषेचे जतन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांनी केले आहे. स्वर्गीय प्रभाकर पाटील सांस्कृतिक मंच तथा प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय, अलिबाग यांच्या संयुक्तविद्यमाने रामनारायण पत्रकार भवन येथे कवीवर्य कुसुमाग्रज तथा मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
वाळेकर म्हणाले की, मराठी माणूस आपल्याचा मातृभाषेपासून लांब होत आहे. ग्लोबल होताना तो आपल्या भाषेचा आग्रह धरत नाही. मुळात हे चुकीचे आहे. महाराष्ट्रात सर्व दुकानात मराठीत पाट्या असल्या पाहिजे यासाठी मा.न्यायालयाने महाराष्ट्रात दुकानात अथवा अन्य ठिकाणी मराठीत पाट्या असाव्यात असा निर्णय दिला आहे. याचे सर्वानी स्वागत केले पाहिजे, असे मत व्यक्त केले.
याशिवाय मराठीच्या निजभाषिकांनी येणार्‍या पिढ्यांसाठी आपल्या भाषेचे जतन, संवर्धन करताना परस्परांसह संवाद साधताना मातृभाषेचा आग्रह धरवा. अगदी समोरची व्यक्ती अन्य भाषिक असली तरी मराठी भाषिकांनी आपला आग्रह कायम राखावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कुसुमाग्रजांना तसेच मराठी भाषेचा गौरवोद्गार करणार्‍या प्रत्येक साहित्यिकांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जेष्ठ नाट्य कर्मी, लेखक तसेच मंचाचे उपाध्यक्ष शरद कोरडे, नगरसेवक बाळू पवार, माजी नगरसेवक आर. के घरत, संतोष जोशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी यांनी तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हेमकांत सोनार यांनी केले.

Exit mobile version