| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
इतिहासाचा साक्षीदार, त्याचप्रमाणे पनवेलची ओळख असलेला कर्नाळा किल्ला अर्थात जैत रे जैत चित्रपटातील लिंगोबाचा डोंगर देखभाल-दुरुस्तीपासून गेल्या अनेक वर्षांपासून वंचित आहे. किल्ल्याचा बुरूज आणि तटबंदी ढासळत आहे. पायर्या झिजल्या आहेत, याशिवाय किल्ल्यावर जाण्यासाठी असलेली पायवाटही आता हरवत चालली आहे.
1670 छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्नाळा किल्ला जिंकून त्याचा स्वराज्यात समावेश करून घेतला. पुरंदरच्या तहात मिर्झा राजे जयसिंगाने इतर गडांबरोबर कर्नाळ्याचाही बळी घेतला. मात्र नंतर पुन्हा हा ऐतिहासिक ठेवा हिंदवी स्वराज्यात सामील झाला. पुढे औरंगजेबाने किल्ल्याला पुन्हा पारतंत्र्यात जेरबंद केले. 1740 साली पेशवांनी कर्नाळा सर केला. 1803 मध्ये दुसर्या बाजीराव पेशव्यांनी राज्याबरोबर हा किल्लाही गमवला. इंग्रजांनी कर्नाळ्यावर स्वतःचा अंमल केला. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा या किल्ल्याचे किल्लेदार होते. एकंदरीत ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय जुना आणि महत्त्वाचा असलेला हा अनमोल ठेवा भौगलिकदृष्ट्या त्या काळात उपायुक्त होता. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कर्नाळ्यावरून मुरूड-जंजिरा, अलिबाग, रायगड, घाटमाथा, मुंबई या सर्व गोष्टी पाहता येत होत्या आणि आजही किल्ल्यावर गेल्यावर त्या दिसतात.
पनवेलला मोठी बाजारपेठ व मिठागरे, बंदर असल्याने टेहळणीकरिता कर्नाळा किल्ला अतिशय महत्त्वाचा समजला जायचा. याच परिसरात घनदाट झाडे आणि पक्ष्यांचे सानिध्य असल्याने पर्यटकांसह ट्रेकर्सही याठिकाणी मोठ्या संख्येने हजेरी लावतात.
मुंबई, ठाणे आणि इतर ठिकाणांहून अनेक जण सुटीच्या दिवशी अथवा खास ट्रेकिंगसाठी कर्नाळ्यात येतात. मात्र गेल्या काही वर्षांत किल्ल्याची पडझड झाली आहे, शासनाकडून निधी मिळत नसल्याने ऐतिहासिक ठेवा विकासापासून वंचित राहिला आहे.
सुळका कोसळतोय
अंगठ्याच्या आकाराचा असलेल्या किल्ल्याचा सुळखा दिवसेंदिवस ढासळतो आहे. किल्ल्यालगत बांधण्यात आलेली तटबंदीही ढासळत चालली आहे. वरती चढण्याकरिता बांधलेल्या पायर्याही झिजल्या आहेत. एकंदरीत या वास्तूची डागडुजी न झाल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. किल्ल्यावर जाण्याकरिता चांगला रस्ता नसल्याने अनेकदा पर्यटक भरकटण्याचे प्रकारही घडले आहेत.