‌‘दिगंबरा‌’च्या जयघोषान दुमदुमला डोंगर

भोवाळे दत्तमंदिरात भक्तांचा महासागर; श्रावणातील गुरूवार दत्तभक्तांसाठी पर्वणीच

| रेवदंडा | निलेश फुंडे |

श्रावण महिन्यातील गुरुवार म्हणजे दत्तभक्तांसाठी भक्ती, श्रद्धा आणि आत्मिक समाधानाचा पर्वणीचा दिवस असतो. अशातच अलिबाग तालुक्यातील चौल येथील निसर्गरम्य डोंगरमाथ्यावर वसलेल्या भोवाळे श्री दत्तमंदिरात यंदाच्या श्रावणी गुरुवारी भक्तांचा अक्षरशः महासागर उसळला होता. यावेळी पहाटेपासूनच “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” या जयघोषाने संपूर्ण डोंगर आणि परिसर दुमदुमून गेला होता.

रायगड जिल्ह्यासह पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबईच्या विविध भागांतून हजारो भाविक गुरूवारी (दि.3) दत्तगुरूंच्या दर्शनासाठी चौल येथील भोवाळे श्री दत्तमंदिरात दाखल झाले होते. यावेळी मंदिर परिसरात सर्वत्र भक्तिभाव, समाधान आणि अध्यात्मिक ऊर्जेचे वातावरण अनुभवायला मिळत होते. या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 700 ते 750 पायऱ्यांचा चढ पार करावा लागतो. मात्र, दत्तभक्तीची ओढ इतकी प्रबळ असते की, हा प्रवास भाविकांसाठी थकव्याचा नसून आनंदाचा सोहळा ठरतो. हिरव्यागार वनराईतून जाणाऱ्या पायऱ्या, झाडांच्या पानांतून डोकावणारा सूर्यप्रकाश, पक्ष्यांचा मंजुळ किलबिलाट आणि डोंगरातून वाहणारा गार वारा मनाला विलक्षण प्रसन्नता देतो. येथील प्रत्येक पायरीवर दत्तनामाचा गजर आणि भक्तांच्या ओठांवरील स्मित पाहताना जणू भक्ती आणि निसर्ग यांचा अद्भूत संगम अनुभवायला मिळत होता.डोंगरमाथ्यावर पोहोचल्यानंतर समोर उलगडणारे दृश्य तर भाविकांना अक्षरशः मंत्रमुग्ध करून टाकत होते. रेवदंड्याची विस्तीर्ण खाडी, अरबी समुद्राचे अथांग निळेशार पाणी, चौल-रेवदंडा परिसरातील निसर्गवैभव आणि दूरवर पसरलेल्या हिरव्यागार डोंगररांगा पाहताना अनेक भाविक मोबाईलमध्ये क्षण कैद करत होते, तर काही जण निसर्गसौंदर्य न्याहाळत शांतपणे ध्यानस्थ बसल्याचे चित्र दिसत होते.

श्रावणी गुरुवारानिमित्त मंदिरात दिवसभर दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. आरती, भजन, नामस्मरण आणि दत्तगुरूंच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. “येथे आल्यावर मनाला वेगळीच शांती मिळते,” अशी भावना अनेक भाविकांनी व्यक्त केली. या विशेष दिवशी चौल-रेवदंडा दत्त पौर्णिमा ग्रुप यांच्यावतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारपासूनच महाप्रसादासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे येथे होणारी अन्नसेवा ही केवळ परंपरा नसून श्रद्धा आणि समाजसेवेचा सुंदर वारसा आहे. प्रसिद्धीपासून दूर राहून अनेक दत्तभक्त वर्षानुवर्षे ही सेवा अविरतपणे करत आहेत. “अन्नदान हेच श्रेष्ठ दान” या विचाराचा प्रत्यय येथे प्रत्येक गुरुवारी येतो. श्रद्धेचा सागर, निसर्गाचे वैभव, दत्तनामाचा गजर आणि सेवाभावातून वाटला जाणारा महाप्रसाद यामुळे चौलचे भोवाळे दत्तमंदिर हे केवळ देवस्थान न राहता हजारो भाविकांच्या मनातील आध्यात्मिक आधारस्थान बनले आहे. श्रावणी गुरुवारी येथे अनुभवायला मिळणारा भक्तीचा हा सोहळा प्रत्येकाच्या मनात समाधान, प्रसन्नता आणि दत्तभक्तीची नवी ऊर्जा निर्माण करून जातो.

Exit mobile version