माथेरनमध्ये डोंगर झाले सोनेरी

निसर्गाची किमया; पर्यटकांची गर्दी

| माथेरान | वार्ताहर |

हरित तृणांची पसरलेली मखमालीचे डोंगर सर्वत्र दिसतात पण या महिन्यात निसर्गाची किमया माथेरानमध्ये पहावयास मिळते. हिरवेगार डोंगर पिवळा साज चढवून सोन्यासारखे दिसत आहेत. ही पर्यटकांसाठी निसर्गाने दिलेली भेट आहे, हे पाहण्यासाठी पर्यटक माथेरानमध्ये येत आहेत.

पावसाळी पर्यटन हंगाम संपल्यानंतर ऑक्टोबरमध्ये निसर्गामध्ये आमूलाग्र बदल होताना हमखास दिसतात. परतीचा पाऊस झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यात सूर्यकिरण माथेरानच्या भूमीला स्पर्श करतात. काही ठिकाणी रिमझिम पाऊस त्यामध्ये डोंगरावर दिसणारे इंद्रधनुष्य पाहून पर्यटक अतिशय आनंदी होतात. पण ऑक्टोबरमध्ये नवरात्रीच्या काही दिवस अगोदर माथेरानच्या सातशे हेक्टरमध्ये सभोवताली पिवळ्या फुलांनी डोंगराचे रुपडे पालटून जाते. या फुलांना सोनकी किव्हा छोटे सुर्यफूल असे सुद्धा म्हणतात.

डोंगरांमध्ये असणारे सफेद फेसळलेले धबधबे,काही ठिकाणी हिरवे गवत आणि त्यामध्ये आलेली ही सोनकी एक निसर्गाचे वरदानच आहे. ज्यावेळेस या सोनकीच्या फुलांवर सूर्यकिरण पडतात त्यावेळी संपूर्ण डोंगर हा सोन्यासारखा दिसतो. हे दृश्य अतिशय विलोभनीय असल्याने ज्या पर्यटकांना या महिन्याची किमया माहिती आहे ते आवर्जून पाहण्यासाठी येतात. नैसर्गिक आलेल्या फुलांना सुगंध जरी नसला तरी लांब डोंगरावर ती फुलल्यावर सर्वत्र पसरल्यानंतर हिरव्या डोंगराचे पिवळ्या रंगामध्ये रूपांतर होऊन ते सोन्यासारखे दिसू लागतात. हे दृश्य नवरात्री होई पर्यंत याची डोळा पाहण्याची संधी पर्यटकांना मिळते.

फुलपाखरांचे थवे
या महिन्यात माथ्यावरील सोनाकीची फुले असतात या फुलांवर बागडताना फुलपाखरांचे थवे हमखास दिसतात. चतुर आणि फुलपाखरे यांच्यात हवेत स्पर्धा सुरू आहे की काय असा भास होतो. निसर्ग अभ्यासक हे दृश्य अगदी जवळून न्याहाळतात. हा सोनाकीच्या फुलांचा आणि फुलपाखरांचा लपंडावाचा खेळ फक्त 20 दिवस चालताना पहावयास मिळतो.
पॉईंट्स दिसतात सोनेरी
पर्यटक माथेरानमध्ये आल्यानंतर हमखास पॉईंटवर नक्कीच जातात. पॉईंट म्हणजे डोंगराचे टोक होय. इथून उंचसखल झाडी, काळ्या दगडींपासून बनलेला डोंगर त्यावर हिरवे तृण आणि या तृणामध्ये उगवलेली सोनकीची सोनेरी फुले हे मनमोहक दृश्य सर्व पॉईंट्सवरून दिसते बाजारपेठेपासून जवळच असलेल्या इको पॉईंटवरून पर्यटक हे दृश्य न्याहाळत असतात.

नवरात्रीच्या पाच ते सहा दिवस अगोदरच माथेरानला भेट देतो तो येथील बदलेला निसर्ग पाहण्यासाठी. हे दृश्य फक्त वीस ते पंचवीस दिवसच पाहवयास मिळते. ज्यांनी निसर्गाचे मनमोहक दृश्य पाहिले नसेल अशा पर्यटकांनी खरोखरच या दिवसात माथेरानला यावे, असे दृश्य पाहण्यासाठी गेली आठ वर्षांपासून आम्ही येत आहोत.

अक्षय सहस्त्रबुद्धे, पर्यटक
Exit mobile version