रायगडात गाव खेड्या पाड्यातील बंद घरांची कुलपे उघडली,
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
कोकणातील महत्त्वाचा आणि सर्वांचा सण म्हणजे गणेशोत्सव आहे. अवघ्या काही दिवसांवरत गणपती सण येऊन ठेपला आहे आणि रायगड जिल्ह्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. येथील बाजारपेठ सजल्या आहेत. गाववाड्यांमध्ये गणेशोत्सवाच्या तयारीची लगबग दिसत आहे.
येथील खेड्यापाड्यातील व वाडीवस्तीवरील बहुसंख्य लोक पुणे मुंबईसह इतर शहरात कामानिमित्त राहतात. मात्र गणेशोत्सवाला आवर्जून गावी येतात. त्यामुळे इतर दिवशी ओस पडलेली गावे व वाड्यांमध्ये आता नवचैतन्य आले आहे. शिवाय येथील अनेक मंडळे गणेशोत्सवात विविध प्रबोधनात्मक व लोकोपयोगी उपक्रम देखील राबवितात. स्थानिक बाजारपेठ विविध वस्तूंनी बहरल्या आहेत.
गणपती सणानिमित्त अनेक चाकरमानी, लहानगे, तरुण व तरुणी आपल्या गावी येत आहेत. त्यामुळे वर्षभर बंद असलेल्या काही घरांचे टाळे आता उघडले आहेत. तसेच एकांतात राहणार्या वृद्ध मंडळींना देखील आपले मूलबाळ, नातवंडे व नातेवाईक घरी आल्याने आनंद होतो. ते प्रचंड सुखावतात. काही दिवसातच गणेशोत्सवाच्या सुट्ट्या लागतील त्यामुळे लहानगे गावात आनंदाने बागडतील व खेळतील. तरुण व मोठे गावाच्या आजूबाजूच्या जंगल व निसर्गाचा आनंद घेतांना दिसतील तर कुणी जुन्या मित्रमंडळींना भेटतील. गावागावात रेलचेल दिसू लागली आहे. गावांना खर्या अर्थाने गावपण आले आहे. गावे वाड्या जणूकाही उजळून निघाल्या आहेत. आर्थिक व्यवहारांना देखील गती आली आहे. प्रत्येकजण गणरायाच्या स्वागतासाठी आतुर झालेला दिसत आहे.
बाप्पाच्या स्वागताची जिकडेतिकडे जय्यत तयारी सुरू झाली आहे. गणरायाची प्रतिष्ठापना झाल्यावर घराघरात गणराया समोर जागरणे आरत्या होतात. काही वेळेस पत्ते खेळले जातात. मात्र सुधागड तालुक्यातील वावे गावातील तरुण गणरायासमोर व्हॉलीबॉल व इतर स्पर्धा घेतात. तर ग्रंथालयात पुस्तके वाचण्यासाठी तरुण व मुले जमतात. अशा प्रकारे गणेशोत्सवात तरुणाईला विधायक कामात गुंतवले जाते. या उपक्रमामुळे गावातील सर्व तरुण मागील काही वर्षांपासून एकत्र येत आहेत. एकमेकांशी विचार विनिमय करु लागली. तरुणांच्या हातातील मोबाईल सुटले. अनेक व्यसनापासून तरुण दुर गेले. तरुण एकत्र आल्याने दुरावलेली मने जुळून आली. या उपक्रमामुळे गणपतीमध्ये एक नवीन आनंदाची आणि एकात्मतेची ऊर्जा गावात पसरते. गणपती उत्सव लोकमान्य टिळकांनी ज्या हेतुन सुरु केला तो हेतु समाजातून कुठेतरी भरकटत चालला आहे. त्यामुळे सर्व तरुण व ग्रामस्थ एकत्र येणे आणि विधायक समाज घडवणे हा या मागच हेतू आहे असे, केतन म्हसके यांनी सांगितले. लहानग्यांनाच जर पर्यावरण स्नेही व पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्व पटवून दिले तर आपोआपच पुढची पिढी पर्यावरणाप्रती अधिक सजग होईल. या उद्देशानेच लहानग्यांसाठी येथे मातीचे गणपती बनविण्याची कार्यशाळा आयोजित केली जाते, असे तज्ञ मार्गदर्शक नेहा देशमुख आणि अभिषेक देशमुख यांनी सांगितले.
महा अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष मोहन भोईर यांनी सांगितले की, जिल्ह्यात काही ठिकाणी सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सवात चमत्कार प्रयोग सादरीकरण, सर्पविज्ञान आदी विधायक व प्रबोधनात्मक कार्यक्रम त्या-त्या शाखांमार्फत राबविले जातात. ज्याला चांगला प्रतिसाद मिळतो. यावर्षी देखील असे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. सुधागड तालुका शाखा कार्याध्यक्ष अमित निंबाळकर यांनी सांगितले की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणरायासमोर प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविणार आहोत.
दुकानदार तयारीत
गणरायाच्या स्वागतासाठी सर्वजण तयारीला लागले आहेत. त्याप्रमाणेच व्यापारी व व्यावसायिकदेखील तयारीत आहेत. गणरायासाठी लागणारी कृत्रिम फुले, हार, सजावटीचे साहित्य अगरबत्ती, धूप आदी वस्तूंची विक्री जोरात सुरु झाली आहे. असे पालीतील सौम्य कलेक्शनचे मालक मुकुंद कोसुंबकर यांनी सांगितले. शिवाय मखर विक्रेतेदेखील सज्ज झाले आहेत. मिठाईवाल्यांनीदेखील कामाला सुरुवात केली आहे. तसेच छोटे मोठे ढोलकी विक्रेतेदेखील विक्रीसाठी ढोलकी घेऊन आले आहेत. साऊंड सिस्टिमवाले देखील तयार आहेत.