विविध सामाजिक संस्थांनी दिला पाठींबा
| पनवेल | वार्ताहर |
महानगरपालिका आणि सिडको यांच्या दुहेरी कराच्या विरोधात परिवर्तन सामाजिक संस्थेने यशस्वीपणे चालू ठेवलेल्या लढ्याला एकता सामाजिक संस्थानेही पुढाकार घेऊन बळ दिले. या संस्थेने रविवारी कामोठे येथे आयोजित केलेल्या सभेला कामोठेकरांनी प्रचंड प्रतिसाद देत ही लढाई अधिक आक्रमक करण्याचा निर्धार केला.
परिवर्तन सामाजिक संस्थेच्या व्यासपिठावरून महानगरपालिकेने लादलेल्या या जाचक, जूलमी दुहेरी करांचा भरणा न करीत पनवेलकरांनी चालू ठेवलेले हे असहकार आंदोलन अशाचप्रकारे प्रत्येक घराघरात पोहचवण्याचाही निर्धार समस्त कामोठेकरांनी या सभेत केला. उच्च न्यायालयातही परिवर्तन सामाजिक संस्थेचे महादेव वाघमारे व ॲड. विजय कुर्ले हे या प्रकरणी आक्रमकपणे पाठपूरावा करीत असल्यामूळे सर्व प्रस्थापित राजकारण्यांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली आहे. महापालिकेच्या प्रशासनाचा अशाप्रकारे जबरदस्ती करवसुलीचे प्रकरण अंगाशी येऊन राजकारण्यांना तोंडघशी पडण्याची भिती वाटत असल्याने एक-दोन वर्षांचा कर माफ करणार असल्याच्या अफवाही हे राजकारणी पनवेलकरांमध्ये पसरवत असल्याचे बोलले जाते. परंतू अशाप्रकारे कितीही अफवा पसरवून पनवेलकरांना राजकारण्यांनी भ्रमित करून पुन्हा मतदारांसमोर येण्याचा प्रयत्न केला, तरी पनवेलकर मात्र यांना आता महानगरपालिका सभागृहात प्रवेश देणार नाहीत, असा निश्चय सभेत केला.
एकता सामाजिक संस्थेने या सभेचे आयोजन केले होते. प्रमुख उपस्थिती ॲड. विजय कुर्ले, ॲड. शिवराज कुंचगे, याचिकाकर्ते महादेव वाघमारे, मा. नगरसेवक प्रमोद भगत, रंजना सलोडिकर, तसेच कामोठे रहिवाशी संघ, जय हरी महिला मंडळ, परिवर्तन युवा मंच, श्री. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, स्वराज प्रतिष्ठान रायगडचा गणराज, आई भवानी मित्र मंडळ, आई भवानी महिला मंडळ, या संस्थांनी सहभाग घेतला होता. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अमोल शितोळे, अल्पेश माने, गौरव पोरवाल, पोपट आवारी, सुरेश खरात, संगीता राऊत, संगीता पवार, हरीश बाबरीया बाळासाहेब सकपाळ आदींनी परिश्रम घेतले.