बॅनरवरुन रोहा तालुक्याचं नाव गायब, फक्त अलिबाग-मुरुडचं करणार नेतृत्व
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
विधानसभा निवडणूक तोंडावर आली असल्याने गेले पाच वर्षे निद्रावस्थेत असलेल्या आमदारांची झोप उडाली आहे. मतदारांना खूष करण्यासाठी पुन्हा एकदा आश्वासनांचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न करताना ते दिसत आहेत. अशातच शेकापच्या मेळाव्यात होणारी गर्दी पाहून त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. त्यामुळे त्यांनीही मेळावे घेण्याचा निर्धार केला. मात्र या मेळाव्यात रोहा तालुक्याला डावललं असल्याचं दिसून आलं. अलिबाग-रोहा मार्गावर रविवारी (दि.13) आयोजित करण्यात आलेल्या शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी त्यांनी चांगलीच बॅनरबाजी केली. मात्र त्यात ज्यांच्या अंगी कतृत्व, तोच करेल अलिबाग-मुरुडचं नेतृत्व असं लिहिण्यात आलं आहे. यावरुन त्यांना रोहा मतदारसंघातील मतदारांची गरज नसल्याची चर्चा परिसरात रंगली होती.
गेल्या पाच वर्षात त्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नसल्याने मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल कमालीची नाराजी आहे. सर्व मुद्दे संपल्यामुळे त्यांनी आता युवकांना केंद्रबिंदू केले आहे. अलिबाग-मुरुडमधील जनतेच्या जीवावर ते निवडून येणार, असा फाजील आत्मविश्वास स्थानिक आमदारांना आहे.
रोहा तालुक्याकडे त्यांनी कायमच दुर्लक्ष केले आहे. रोहा तालुक्यातील काही भाग हा अलिबाग-रोहा-मुरुड मतदारसंघात आहे. रोह्यात जवळपास हजारो मतदार असून त्यांच्यात आमदार निवडून आणण्याची ताकद आहे. मात्र त्यांच्या मतदारांची आमदारांना गरज नसल्याचं त्यांनी झळकविलेल्या बॅनरवरुन दिसत आहे.
रोहेकरांची भूमिका महत्वाची
शिंदे गटाच्या मेळाव्यात आमदारांच्या काही बॅनरवरुन रोहा तालुक्याचं नाव वगळण्यात आलं होतं. निर्णायक मतदार असतानाही आमदारांनी तालुक्याला नाकारल्यानंतर रोहा मतदारसंघातील मतदार नेमकी काय भूमिका घेणार, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून रहिले आहे.