देशातील मानांकित चित्रकारांची उपस्थिती
विजेत्यांमध्ये जेजे स्कुलचे वर्चस्व
। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरानचा निसर्ग जगातील कोणत्याही चित्रकाराला आकर्षित करणारा असतो.त्यामुळे हा निसर्ग रेखाटण्याची एकही संधी चित्रकार सोडत नाही. त्यामुळे मानाच्या समजल्या जाणार्या लँडस्केप पेंटिंग स्पर्धेत राज्याबाहेर असंख्य चित्रकार माथेरानला पोहचले. या स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा माथेरानचा निसर्ग कॅनव्हासवर उतरला असून या स्पर्धेतील विजेत्यांवर मात्र मुंबईतील सर जेजे स्कुल ऑफ आर्टसच्या चित्रकारांचे वर्चस्व राहिले.
जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ माथेरान मध्ये चित्रकारांच्या कुंचल्यातून माथेरानचा निसर्ग उतरला. निसर्गप्रेमी प्रसाद सावंत यांच्या संकल्पनेतून गेली पाच वर्षे लँडस्केप पेंटिंग ही चित्रकला स्पर्धा आयोजित केली जाते. मागील दोन वर्षे कोविडमुळे ही स्पर्धा होऊ शकली नाही. पण यावर्षी सर्व राज्यातून चित्रकारांनी आपली उपस्थिती दर्शवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने या स्पर्धेची रंगत वाढली. दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातून चित्रकार आदल्या दिवशी माथेरानमध्ये पोहचले होते आणि त्यांनी माथेरान फिरून निसर्ग चित्र काढण्याची जागा निश्चित केली होती. त्यानुसार माथेरानचा निसर्ग कॅनव्हासवर उतरण्यास सकाळपासून सुरुवात झाली. दुपारी तीन वाजता काढलेली चित्र जमा करून परीक्षक चित्रकार वैभव नाईक आणि अमित ढाणे यांच्याकडे जमा केली. देशाच्या विविध भागातून 82 स्पर्धकांनी आपली चित्रे काढली होती.
ही सर्व चित्रे आयोजकांनी माथेरानच्या मध्यवर्ती भागातील श्रीराम चौकात पर्यटक आणि माथेरानकर यांच्यासाठी प्रदर्शित केली. त्या सर्व चित्रांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार पराग बोरसे यांनी नजर फिरवली आणि सर्वांचे कौतुक केले. त्यावेळी माजी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, आयोजक प्रसाद सावंत, माजी नगरसेवक शकील पटेल,कुलदीप जाधव,नरेश काळे, राजेंद्द शिंदे,कीर्ती मोरे,जाधव,सोनम दाभेकर,ज्योती सोनावणे आदी तसेच अनिल गायकवाड,निमेश मेहता यांनी पाहणी केली. त्यावेळी माथेरानच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक सुरेखा भणगे,माथेरानचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे यांनी चित्रकारांचे कौतुक केले आणि विजेत्यांना पारितोषिके दिली.
स्पर्धेचा निकाल
प्रथम :-स्वप्नील पाटे, द्वितीय -संकेत थोरात, तृतीय :-अजित राऊत (तिघेही जे.जे.स्कूल) उतेजनार्थ:- दीपक कुमार शर्मा,पुणे) वैभव गायकवाड, नाशिक, आकाश खेतावत, ठाणे प्रणय फराटे, रत्नागिरी विशेष सन्मान माथेरान मधील दोन विद्यार्थिनी या स्पर्धेत भाग घेतला होता माथेरान मधील विद्यार्थ्यांमध्ये रुची वाढावी यासाठी श्रुती घावरे व पौर्णिमा कदम यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
माथेरानचा निसर्ग उतरला कॅनव्हासवर
