राष्ट्रवादीच्या घड्याळात ‌‘वाजले की बारा’

| नागपूर | प्रतिनिधी |

नागपुरातून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नागपूर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची दिवाळी स्नेहमीलन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी कार्यालयात लावणीचे सादरीकरण करण्यात आले. त्यामुळे आता राजकारणात नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याप्रकरणी पक्षातील एका नेत्याने स्पष्टीकरण दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेशपेठ येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात रविवारी (दि.26) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या दिवाळी स्नेहमीलन कार्यक्रमात शिल्पा शाहीर यांनी नृत्य सादर केल्याचे एका व्हिडीओमधून दिसून आले आहे. शिल्पा शाहीर नृत्यांगना असून त्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी असल्याच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे. त्यात त्यांनी ‌‘वाजले की बारा’ या लावणीवर ठेका धरला असून, हा व्हिडीओ वायरल झाल्यावर वाद होण्याची शक्यता आता वर्तवण्यात आली आहे. याप्रकरणी बोलताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अनिल अहिरकर यांनी सांगितले की, अनेक ठिकाणी मुख्यमंत्री यांच्यासमोर सुद्धा लावणी होते. त्यामुळे यात काही गैर वाटत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या कार्यालयातच लावणीचा कार्यक्रम झाल्यानंतर अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

Exit mobile version