रायगडच्या सुपुत्रांची स्वातंत्र्याची अमृत परिक्रमा

75 दिवसात 21000 किमी मोटारसायकल प्रवास
। अलिबाग । भारत रांजणकर ।
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात मस्वातंत्र्याचा अमृत महोत्सवफ उत्साहात साजरा करण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा येथील प्रसाद चौलकर आणि पनवेल येथील अभिजित सिंग कोहली हे दोन बाईकस्वार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अनोख्या पद्धतीने साजरा करीत आहेत. मोटारसायकलवर भारत भ्रमण करून देशाच्या गौरवशाली ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचे जगाला दर्शन घडवण्यासाठी हे दोघे बाईकस्वार देश भ्रमंतीसाठी निघाले आहेत.

सदरील 75 दिवसांची परिक्रमा एकूण 3 टप्प्यात करण्यात येत आहे. परिक्रमेच्या दुसर्‍या पर्वाला दिनांक 20 एप्रिल 2022 रोजी पनवेल येथून सुरुवात झाली होती. गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मु काश्मीर, हिमाचल, उत्तराखंड इत्यादी राज्यातून प्रवास करून दिनांक 3 मे रोजी ती दिल्ली येथे पोहचली. भारत पर्यटन दिल्ली, पर्यटन मंत्रालय (भारत सरकार) तसेच एम्स दिल्ली या ठिकाणी बाईकस्वारांचे स्वागत करण्यात आले. यानंतर मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, झारखंड, बिहार, पश्‍चिम बंगाल, ओडिशा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू केरळ इत्यादी 18 राज्य, 5 केंद्रशासित प्रदेश आणि 11,000 किलोमीटरची विक्रमी बाईक राइड करून दोघे बाईकस्वार दिनांक 31 मे रोजी मुंबईत दाखल झाले. इंडिया टुरिझम मुंबई येथे त्यांचे स्वागत करून परिक्रमेचे दुसरे पर्व संपल्याचे जाहीर करण्यात आले. अमेरिकेतील ख्यातनाम डॉक्टर तसेच इंडुसेम चे संस्थापक डॉ. सागर गालवणकर यांच्या संकल्पनेतील स्वातंत्र्याची अमृत परिक्रमा रायगड जिल्ह्यातील हे दोघे बाईकस्वार वास्तवात उतरवत आहेत.

परिक्रमेचे पहिले पर्व यशस्वी पूर्ण केले
स्वातंत्र्याची अमृत परिक्रमा ही एकूण 75 दिवसांची देशव्यापी राइड असून परिक्रमेचा पहिला टप्पा नोव्हेंबर 2021 मध्ये एकूण 12 राज्ये आणि 7000 किलोमीटरचा प्रवास करून पूर्ण केला गेला. या राइड दरम्यान भारतीय चलनावर छापलेल्या ऐतिहासिक स्थळांना त्यांनी भेट दिली. भारताचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभव जगापुढे आणण्याचा हा एक प्रयत्न होता. या विक्रमी बाईक राईडची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स तसेच हावर्ड वर्ल्ड रेकॉर्ड लंडन या संस्थांद्वारे घेण्यात आली.

परिक्रमेचे पर्व दुसरे
परिक्रमेचा दुसरा टप्पा गाठत असताना भारतीय राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ बाईक राइड केली गेली. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा या राष्ट्रगीतामध्ये नमूद केलेल्या प्रदेशांना तसेच नद्यांना या परिक्रमेत भेट दिली गेली. या परिक्रमेत एक भारत श्रेष्ठ भारत, अतुल्य भारत, देखो अपना देश या भारत सरकारच्या पर्यटन योजनांचा देखील यामध्ये प्रामुख्याने प्रचार आणि प्रसार केला जात आहे. भारत पर्यटन दिल्ली, पर्यटन मंत्रालय, भारत सरकार यांच्या योगदानातुन सुरू असलेली ही बाईक राइड भारतातील पर्यटन वाढीस हातभार लावण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणार आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन कोलाबरेटिव्ह सेंटर फॉर इमेर्जेन्स अँड ट्रॉमा, एम्स दिल्ली, तसेच या जगविख्यात संस्थेचे या देशव्यापी बाइक राइड साठी पाठबळ मिळत आहे.

प्रसाद चौलकर यांनी या आधी नेपाळ, भूतान तसेच भारतातील 24 राज्यांमध्ये बाईक राइड केलेली आहे, त्यांच्या क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील विशेष कामगिरी बद्दल जिल्हा परिषद रायगड तर्फे रायगड मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. दुसरे बाईकस्वार अभिजित सिंग कोहली हे एक अनुभवी बाईक रायडर आणि युट्यूब ब्लॉगर असून त्यांना बाईकर ग्यानी म्हणून ओळखले. सोशल मीडियावर सुरक्षित प्रवास तसेच बाईक राइड साठी गरजेच्या साधनांविषयी माहिती देत असतात. बाईक राइड संबधी विविध विक्रम त्यांच्या नावावर आहेत.

सदरची परिक्रमा 3 टप्प्यात होत असून या अमृत महोत्सवी वर्षात एकूण 75 दिवस आणि 21000 किलोमीटरची बाईक राइड होणार आहे. परिक्रमेचे दोन टप्पे यशस्वीपणे पूर्ण केले असून नोव्हेंबर 2021 मध्ये 23 दिवस, दुसर्‍या पर्वात 42 दिवस राइड केली गेली. शेवटचा टप्पा हा 10 दिवसाचा असणार आहे. परिक्रमेची समाप्ती 15 ऑगस्ट 2022 रोजी नवी दिल्ली येथे होईल.

बाईक राइड करताना नेहमीच काहीतरी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करीत असतो, प्रवास करीत असताना अनेक अपघात बघत असतो त्यामुळे बाईक चालवताना हेल्मेट घालणे किती गरजेचे आहे ते लोकांना पटवून देणे महत्त्वाचे वाटते.

– प्रसाद चौलकर, बाईकस्वार
Exit mobile version