उरणमध्ये इतिहासाच्या पाऊलखुणा; वैष्णव परंपरेचा इतिहास जतन करण्याची मागणी
। उरण । प्रतिनिधी ।
मुंबईपासून अवघ्या दोन तासांवर असणार्या उरण तालुक्यातील पिरकोन, जासई, पुनाडे, आवरे गावात इतिहासाच्या पाऊलखुणा वीरगळीच्या रूपात आढळून येत आहेत. जवळपास हजार वर्षे जुन्या वीरगळ या गावातील डोंगर व मंदिर परिसरात दिसून येत आहेत. अकराव्या शतकातील इतिहास नष्ट होता कामा नये, याकरिता वीरगळींचे संवर्धन होणे फार गरजेचे असल्याचे इतिहासकारांकडून सांगण्यात येत आहे. शैव आणि वैष्णव या दोन्ही परंपरांचे एकत्रिकरण उरण तालुक्यात पाहायला मिळते आहे.
तालुक्यातील पिरकोन येथे वीरगळी तर चिरनेर-रानसई येथे गद्यगळी मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. पिरकोन गावात निसर्गाच्या सानिध्यात असणार्या लोकवस्तीपासून दूर असलेल्या मंदिरांची झीज होऊन येथील दोन दगडी नंदी आजही मात्र सुस्थितीत असल्याचे दिसून येत आहेत. या मंदिराच्या चौथर्याखाली उतरल्यावर दोन शिळा आधाराने ठेवलेल्या दिसतात. पूर्वी यवनांची हिंदू मंदिरांवर आक्रमणे होत. त्यामुळे मंदिर परिसरातील शिवलिंग व नंदी जमिनीखाली गाडले होते. त्याचे उत्खनन केल्यानंतर मंदिर परिसरात शिवलिंग व नंदी आढळल्याने या जागेत शिवमंदिर बांधण्यात आले आहे. अशीच भग्न शिळा समोरील बोडणीच्या (छोटा तलाव) कडेला ठेवल्याचेही आढळून येते. अनेक शतकांपासून ऊन, वारा, पावसाचा मारा सहन करीत या शिळा मंदिराबाहेर पडून आहेत.
येथील ‘सतीशिळा’ किंवा ‘सतीचा दगड’ लक्ष वेधून घेतो. सतीशिळा किंवा सतीचे दगड यावर एकच चित्र कोरलेले असते. त्रिकोणी माथा असलेल्या सपाट दगडावर काटकोनात दुमडलेला हाताचा कोपरा आणि हाताचा पंजा दाखवलेला असतो. दंडावर नक्षीदार चोळी, मनगटापर्यंत चुडा भरलेला हात आणि बाजूला दोन मानवी आकृत्या असतात. या शिळेचा अर्थ असा, की ज्या घोडेस्वाराने युद्धात वीरमरण पत्करले आहे त्याच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी त्याच्यासोबत सती गेलेली आहे. एका वीरपत्नीचे हे स्मारक आहे. याच वीरगळांसमोरील भागात आणखी एक वीरगळ भग्नावस्थेत पडून आहे.