| सुधागड-पाली | वार्ताहर | सुधागड तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या आवारात बसवण्यात आलेली पाणपोई गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. संबंधित प्रशासनाचे या पाणपोईच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी, संपूर्ण तालुक्यातून तहसील कार्यालयात येणार्या नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत आहेत.
तहसील कार्यालयात कामानिमित्त येणार्या नागरिकांना पाणी उपलब्ध होण्यासाठी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या सौजन्याने ही सुसज्ज व मोठी पाणपोई बनवण्यात आली होती. पाणपोई बंद असल्यामुळे तहसील कार्यालयात येणार्या नागरिकांना पाण्यासाठी वीस रुपयांची पाण्याची बाटली घेऊन तहान भागवावी लागत आहे. गोरगरीब जनतेला हकनाक हा भुर्दंड बसत आहे. लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या पाणपोईची देखभाल दुरुस्ती झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल, असे येथे येणार्या लोकांचे म्हणणे आहे.