133 पैकी 57 ठिकाणची कामे बंद स्थितीत; 17 ठिकाणची कामे पूर्ण
| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
जलजीवन मिशन योजनेची गाडी पनवेलमध्ये संथ गतीने सुरू आहे. आत्तापर्यंत 133 पैकी केवळ 17 ठिकाणचीच कामे पूर्ण स्थितीत आहेत. तर 57 ठिकाणची कामे सध्या बंद स्थितीत असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे उर्वरित कामे कधी पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ठेकेदारांच्या हलगर्जीपणाचा फटका गावातील नागरिकांना बसत आहे.
पनवेल तालुक्यातील आंबे तर्फे तळोजे, आंबिवली, चिखले, दापिवली, दिघाटी, जांभिवली, कल्हे, कराडे बुद्रुक, करंबेळी तर्फे तळोजे, खानाव, मोहोदर, मोहपे, नितळस, सांगडे, शिवकर, वांगणी तर्फे तळोजे, वांगणी तर्फे वाजे या 17 ठिकाणची कामे 100 टक्के पूर्ण झाली असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली. तर आजीवली, भिंगारवाडी, सोमटणे, वडघर या ठिकाणी शून्य टक्के काम आहे. शून्य ते पंचवीस टक्के कामापैकी आदई येथील काम संथ गतीने सुरू आहे. सोमटणे येथे फेरनिविदा काढण्यात येणार आहे. तर बोरले आणि शेडुंग येथे या योजनेची आवश्यकता नसल्याचे ग्रामपंचायतीने कळवल्यामुळे सदरची योजना रद्द साठी प्रस्तावित आहे. जलजीवन मिशन योजनेसाठी पडलेल्या खड्ड्यांमुळे गावातील रस्त्यांची पुरती वाट लागलेली आहे. येथील काम पूर्ण तर झाले नाहीच; शिवाय खड्ड्यांमुळे वाहनांनादेखील अडचण निर्माण झाली. कित्येक ठिकाणी अर्धवट कामे गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. अतिशय संथ गतीने कामे सुरू असल्याने त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. अनेकदा कंत्राटदार आणि ग्रामस्थांमध्ये वादाचे प्रसंग ओढवले आहेत.
बरेचशा गावांमध्ये केवळ साठवण टाकीचे, वितरण वाहिनीचे, ऊर्ध्व वाहिनी, गुरुत्ववाहिनीचे काम झालेले असून, सद्यःस्थितीत 57 कामे बंद आहेत. तर काही ठिकाणी फेरनिविदा काढण्यात येणार आहेत. काही ठेकेदारांच्या कामाची मुदत संपलेली आहे. वेळेवर काम पूर्ण न करणार्या ठेकेदारांना काळया यादीत टाकून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
योजनेची सद्यःस्थिती | किती कामे | |
0 ते 25 | 09 | |
25 ते 50 | 24 | |
50 ते 75 | 40 | |
75 ते 95 | 25 | |
95 ते 99 | 18 | |
100 | 17 |