डिजिटल साक्षरता काळाची गरज : सुधाकर रघतवान

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
नवीन दशक हे बँकिंगच्या दृष्टीकोनातून अधिक आव्हानांचे तसेच सतर्क राहून व्यवहार करायचे असून, डिजिटल सेवांमुळे माणसाचे यापुढील आयुष्य अधिक सोपे आणि गतिमान होणार असून, आपण सर्वांनी या बदलाचा भाग बनणे फार आवश्यक आहे. त्यामुळे डिजिटल साक्षरता ही आजच्या काळाची गरज आहे, असे प्रतिपादन नाबार्डचे जिल्हा प्रबंधक सुधाकर रघतवान यांनी गुरुवारी रायगड जिल्हा सहकारी बँकेमध्ये नाबार्ड स्थापना दिनाच्या औचित्याने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये केले.

यावेळी रायगड जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, डेप्युटी जनरल मॅनेजर मंदार वर्तक, चीफ मॅनेजर व्ही.एस. पाटील, भारत नांदगावकर, प्रकाश म्हात्रे, डेप्युटी जनरल मॅनेजर संदेश पवार हे उपस्थित होते. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक आणि रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने बँकेच्या केंद्र कार्यालयामध्ये आर्थिक आणि डिजिटल साक्षरता अभियान अंतर्गत बचतगटाच्या महिलांना यावेळी उद्योजिका विषयवार मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी उपस्थित महिलांना संबोधित करताना बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांनी महिलांनी व्यवसाय करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन करताना बँकेच्या वतीने आवश्यक असे अर्थसहाय्य सोबत मार्केटिंगच्या सुविधासुद्धा दिल्या जातील, याबद्दल आश्‍वासित केले. तसेच बँकेच्या वतीने 20,000 पेक्षा अधिक गट स्थापन करण्यात आलेले असून, या आर्थिक वर्षामध्ये 500 पेक्षा अधिक गटांना युनिट उभारणीकरिता बँकेने उद्दिष्ट्य निश्‍चित केलेले असून, महिलांनी त्याचा फायदा घ्यावा, असे आवाहन प्रदीप नाईक यांनी केले.

यावेळी बचतगटातील महिलांना लघुउद्योग करताना येणा-या अडचणी आणि त्यासाठी आवश्यक ते पाठबळ आणि साधनसामुग्रीकरिता करावयाचे नियोजन याबाबाबत बँकेच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले. शिवाय, महिलांनी आपल्या व्यवसायामध्ये नाविन्य आणताना मार्केटिंगच्या काही कल्पना आपल्यासोबत कशा जोडाव्यात याबाबतदेखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच बँकेचे अधिकारी संदीप जगे आणि समरेश पाटील यांनी डिजिटल साक्षरताबाबत उपस्थितांना माहितीचे सादरीकरण केले आणि बँकांच्या योजनेबाबत ग्राहकांनी अद्ययावत माहिती कशी आणि कुठून मिळवावी, याबाबत मार्गदर्शन केले.

जिल्हाभर 200 कार्यक्रम
कोरोनाच्या पार्श्भूमीवर निवडक महिलांनाच यावेळी संधी देण्यात आलेली असून, बँकेच्या वतीने जिल्ह्यामध्ये असे 200 कार्यक्रम करण्यात येणार असून, शेतकरी, महिला बचत गट, विद्यार्थी यांना आर्थिक आणि डिजिटल साक्षरता अभियानांतर्गत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Exit mobile version