पावसाळी पर्यटन स्थळ विकसित करण्याची गरज

। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल शहराचा झपाट्याने विकास होत असला तरी ग्रामीण भागातील अजूनही निसर्ग सौंदर्याने नटला असून, पावसाळ्यात सौंदर्यात आणखीनच भर पडते. त्यामुळे पावसाळी सहलीसाठी अनेकांची पावले पनवेलच्या दिशेने वळतात. पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू स्थानी खारघरमधील पांडवकडा धबधबा, कर्नाळा पक्षी अभयारण्य, मोर्बे धरण, गाडेश्‍वर धरण, माची प्रबळगड, कलावती दुर्ग ही स्थळे आहेत. मध्यंतरी झालेल्या काही दुर्घटनांमुळे यंदाही पर्यटनस्थळावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरीही काही पर्यटक आडवाटेने याठिकाणी पोचतात.

पर्यटन स्थळावर सरसकट बंदी घालण्याऐवजी परिसराचा विकास केल्यास, सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केल्यास महापालिकेच्या महसुलात वाढ होईल शिवाय स्थानिकांनाही रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रशासनाचे प्रयत्नही सुरू आहेत. कर्नाळा पक्षी अभयारण्य पनवेलपासून केवळ 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्नाळा पक्षी अभयारण्याला पर्यटक नेहमीच पसंती देतात. शेकडो प्रजातीच्या वनस्पती आणि पशू-पक्षी आढळणार्‍या कर्नाळा पक्षी अभयारण्यात पावसाळ्यात अनेक-लहान मोठे पाण्याचे ओढे तयार होत असल्याने पावसाळी सहलीसाठी पर्यटक आवर्जून भेट देतात.

पांडवकडा धबधबा उंच कड्यावरून कोसळणार्‍या धबधब्यामुळे पावसाळ्यात पर्यटक हमखास हजेरी लावतात. याठिकाणी झालेल्या अपघातांमुळे धबधब्यावर जाण्यास बंदी असली तरी खारघर टेकडी तसेच लगतच्या परिसरातील ओढे, धबधब्यावर पर्यटक भेट देतात. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास व्हावा यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला असून मंजुरीसाठी शासनदरबारी प्रलंबित आहे.

Exit mobile version