नेरळ-माथेरान घाट रस्ता सुरळीत

पोलीस अधीक्षकांचे वाहतूक नियोजन

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ-माथेरान घाटरस्ता शनिवार-रविवार तसेच सलग सुट्ट्या लागून आल्यांनतर वाहतूक कोंडीत सापडत असतो. यावर्षी ख्रिसमस आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी माथेरानमध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणत गर्दी होत आहे. विशेष म्हणजे दरवेळेला वाहतूक कोंडीत सापडणारा नरेळ-माथेरान हा घाटरस्ता यावेळी कोंडीत सापडला नाही. रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी जिल्ह्यात वाहतूक कोंडीचे नियोजन केल्याने कोंडीची समस्या उद्भवली नाही.

ख्रिसमस आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांमुळे दरवर्षी माथेरान फुल्ल होत असते. त्यात पर्यटकांच्या मोठ्या संख्येने येणाऱ्या वाहनांमुळे नेरळ-माथेरान घाट रस्ता वाहतूक कोंडीत अडकत असतो. त्यामुळे पर्यटकांना या वाहतूक कोंडीत दोन-तीन तास पर्यटकांची अडकून पडावे लागते. मागच्या शनिवार-रविवारी हिच परिस्थिती माथेरानमध्ये होती. त्यात नाताळच्या सलग सुट्ट्या लागून आल्यानंतर पर्यटकांसह त्यांच्या खासगी वाहनांचे प्रमाण वाढल्याने तासनतास कोंडीत अडकून पडण्याची वेळ पर्यटकांवर येत होती. त्यामुळे यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल भर दिला. त्यांनी जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांवरील रस्त्यांचा अभ्यास करून वाहतूक कोंडी होणारी स्थाने निश्चित केली. त्यानुसार ख्रिसमस ते नवीन वर्षाचा पहिला दिवस या कालावधीत वाहतूक पोलिसांचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्ह्याचे वाहतूक भुजबळ यांना सर्वाधिकार देत वाहतूक कोंडीत कोणी अडकणार नाही, यावर नियोजन करण्याचे धोरण निश्चित केले. त्यानुसार माथेरानकडे खासगी वाहने घेऊन जाणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षात घेऊन दस्तुरी नाका, तसेच नेरळ येथील हुतात्मा चौकात वाहतुकीचे नियोजन करणारे पॉईंट बनविण्यात आले. दरम्यान, माथेरान दस्तुरी नाका येथील वाहनतळ फुल्ल झाल्यावर खाली नेरळ येथे खासगी वाहनांना पार्किंग करण्याची सूचना केली जाते. तेथून टॅक्सी सेवेने माथेरान कडे पाठवण्यात येते. त्यामुळे ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक बहुसंख्येने आलेले असताना देखील शनिवारी (दि.27) व रविवारी (दि.28) नेरळ-माथेरान घाटरस्ता वाहतूक कोंडीत सापडला नाही.

Exit mobile version