दस्तुरी नाका येथील प्रवेशद्वार सजवले
। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान शहरात सरत्या वर्षाला निरोप येणार्या पर्यटकांची संख्या हजारांमध्ये असते. हे लक्षात घेऊन पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी पालिका प्रशासनाने योग्य नियोजन करण्यात येत आहे. तर, पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी पालिकेने दस्तुरी नाका येथील प्रवेशद्वार सजवले आहे. दरम्यान, माथेरान शहरात गुलाबी थंडी अनुभवण्यासाठी हजारो पर्यटक हजेरी लावतील असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे.
मुंबईपासून जवळ असलेल्या माथेरानमध्ये पर्यटक सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी हजारोंचे संख्येने गर्दी करत असतात. हे लक्षात घेऊन माथेरानमधील हॉटेल व्यवसायिकांपासून अगदी लहान व्यवसायिक या पर्यटन हंगामासाठी सज्ज झाला आहे. तसेच, हा हंगाम माथेरानमध्ये दरवर्षी जोरदार होत असल्याने माथेरान शहरात येणार्या पर्यटकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. यावेळी, माथेरान शहरात येणार्या पर्यटकांचे स्वागत करण्यातही माथेरान पालिका आघाडीवर असून या पर्यटन स्थळाचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तूरी नाका येथे स्वागताचे मनोरे उभे करण्यात आले आहेत. प्रवेशद्वार रंगीबेरंगी विजेच्या दिव्यांनी सज्ज झाले असून येथील रंगीबेरगी फुगे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
तर, दुसरीकडे पुढील पाच ते सहा दिवस शहरातील कोणत्याही रस्त्यांवर कचरा साचून राहू नये म्हणून व पर्यटकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्वच्छता व आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांची वर्दळ शहरात दिसून येणार आहे. तसेच, शहरात येणार्या पर्यटकांची संख्या लक्षात घेऊन पाणी पुरवठा योजना व्यवस्थित सुरू रहावी यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून नियोजन केले जात आहे. तर, नेरळ-माथेरान घाटरस्ता यामार्गे प्रवासी वाहतूक करणारे टॅक्सी संघटना यांनी देखील 24 तास सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. आणि पोलीस प्रशासनाकडून पार्किंग फुल्ल झाल्यावर घाटरस्ता वाहतूक कोंडीमध्ये अडकु नये यासाठी नेरळ पोलिसांचे सहकार्य घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.