नवीन घंटागाड्या 1 नोव्हेंबरपासून वापरात येणार

शेतकरी कामगार पक्षाच्या दणक्याने प्रशासनाला आली जाग
| उरण | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाने घंटागाड्यांबाबत आक्रमक भूमिका घेतल्याने अखेर प्रशासनाला जाग आली आहे. आता विनावापर धूळखात पडलेल्या घंटागाड्या 1 नोव्हेंबरपासून वापरण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

2018 पासून पनवेल महानगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी सिडकोकडून आपल्याकडे घेतली होती. या निर्णयावर प्रचंड टीका झाली होती. मागील काही महिन्यात कचरा उचलण्यासाठी नवीन 81 घंटा गाड्यांची पालिकेने खरेदी केली होती. त्यातील 53 गाड्या कामोठेमधील मलनिःसारण केंद्रात उन्हा पावसात धूळ खात पडून होत्या. पालिकेच्या या गचाळ कारभाराविरुद्ध शेतकरी कामगार पक्षाने दसऱ्याच्या दिवशी गाड्यांचे पूजन आणि काळ्या फिती लावून अनोखे निषेध आंदोलन केले होते.

या पार्श्वभूमीवर महापालिकेने 1 नोव्हेंबरपासून नवीन घंटा गाड्यांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. दररोज कचरा संकलित करण्यात येणार आहे. त्यामधूनच दुर्गंधीपासून नागरिकांची सुटका होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. पालिकेने कर्मचाऱ्यांना पोशाख, सुरक्षा साहित्य तसेच नियमित पगाराचे वितरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कचरा संकलनासाठी एकूण 509 कर्मचारी असून गाड्यांची संख्या देखील 81 वरून 164 करण्यात आली आहे.

पाच महिन्यानंतर का होईना प्रशासनाला आपल्या नवीन गाड्यांची आठवण झाली. लवकरच कचरा दुर्गंधीमधून नागरिकांची सुटका होईल, अशी भावना शेकाप कार्याध्यक्ष गौरव पोरवाल यांनी व्यक्त केली. कंत्राटदराने जर सुका आणि ओला कचरा वेगवेगळा संकलित केला, तर रहिवाशी देखील कचरा वर्ग करून प्रशासनाला सहकार्य करतील, अशी प्रतिक्रिया शेकाप कामोठे शहर अध्यक्ष अमोल शितोळे यांनी दिली.

Exit mobile version