चार महिन्यात 12 कुपोषित बालकांवरच उपचार
। नेरळ । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग येथे कुपोषित बालकांवर उपचार करणारे पुनर्वसन केंद्र आहे. मात्र रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक कुपोषण हे कर्जत तालुक्यात असल्याने या आदिवासी तालुक्यासाठी शासनाने बाल पुनर्वसन केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु तालुक्यात कुपोषणाने ग्रासलेली बालके असताना देखील या पुनर्वसन केंद्रात चार महिन्यात केवळ 12 कुपोषित बालकांनी उपचार घेतले आहेत. दरम्यान, कुपोषित बालकांसाठी बनवलेल्या त्या खास प्रभागाचा फायदा कर्जत तालुक्यातील कुपोषित बालकांना मिळावा यासाठी एकात्मिक बालविकास विभाग कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे.
कर्जत तालुक्यात अशा सर्व प्रकारे कुपोषणाने ग्रासलेली तब्बल 900 बालके आहेत.त्यांच्यासाठी अनेक सवयंसेवी संस्था यांच्याकडून अतिरिक्त पोषण आहार वेळोवेळी देण्यात येत असतो.शासनाकडून देखील दररोज अंगणवाडी केंद्रावर अशा कुपोषित बालकांना पोषण आहार देण्यात येतो. या सर्व परिस्थितीवर मात करून कर्जत तालुक्यात असलेले कुपोषण खाली आणण्यासाठी शासनाने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात अलिबाग सह कर्जत तालुक्यासाठी मंजूर नेलेले बाल पुनर्वसन केंद्र म्हणजे एनआरसी सुरु झाली आहे. त्या ठिकाणी कुपोषित बालकाला 21 दिवस ठेवून त्या बालकाला कुपोषणाच्या बाहेर आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्या केंद्रात दाखल झालेल्या बालकांवर बालरोग तज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार केले जातात. या 21 दिवसात त्या बालकाच्या पालकांची मजुरी बुडून त्यांचे कुटुंब प्रमुख यांच्याकडून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालावा यासाठी शासनाकडून दरडोई 300 रूपये मजुरी दिली जाते. 21 दिवस रुग्णालयात राहून उपचार घेतल्यावर संबंधित बालके हि पूर्णपणे तंदरुस्त होत असतात. मात्र चार महिन्यापासून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात बाल पुनर्वसन केंद्र सुरु होऊन देखील कुपोषित बालके उपचार करून घेण्यासाठी दाखल करून घेण्याची कार्यवाही एकात्मिक बालविकास विभाग करताना दिसत नाही.
दरम्यान, शासनाने लाखो रूपये खर्चून कर्जत उपजिल्हा रुग्णालय येथे कुपोषित बालकांसाठी बाल पुनर्वसन केंद्र सुरु केले आहे. मात्र मागील चार महिन्यात केवळ 12 बालकांनी या केंद्रात दाखल होऊन उपचार घेतले आहेत. कर्जत तालुक्यात अतितीव्र कुपोषित म्हणजे सॅम आणि तीव्र कुपोषित म्हणजे मॅम श्रेणीमधील किमान 70-80 बालके आहेत. असे असताना त्यांच्यावर बाल पुनर्वसन केंद्रात दाखल करून उपचार करून घेण्यासाठी एकात्मिक बालविकास विभाग निरुत्साही असल्याचे दिसून येत आहे.अशावेळी कर्जत तालुक्यात कुपोषण कसे कमी होणार हा प्रश्न कायम आहे.
दोघांची कुपोषणावर मात
कर्जत उपजिल्हा रुग्णालयात एका टप्प्यात दोन आणि दुसर्या टप्प्यात 11 कुपोषित बालके यांनी उपचार घेतले आहेत. त्यात वाघमारे बहीण भाऊ यांनी उपचार घेऊन कुपोषणावर मात केली आहे.