वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान
। उरण । वार्ताहर ।
नवी मुंबई शहरात लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना, आजूबाजूची गावंदेखील मागे राहिलेली नाही. शहराच्या जवळील गावातदेखील लोकसंख्या झापाट्याने वाढत आहे. यात परप्रांतीयांची भर पडत आहे. त्याचबरोबर अनधिकृतपणे वास्तव्य करणार्या बांगलादेशी नागरिकांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. त्यांची कोणतीही कागदपत्रे न तपासता त्यांना गावठाणात थारा दिला जात आहे. त्यामुळे पोलिसांकडून नवी मुंबई, पनवेल आणि उरणमध्ये सातत्याने बांगलादेशी नगरिकांविरोधात होत असलेल्या कारवाईने हे कटूसत्य उघड होऊ लागले आहे.
21 व्या शतकातील सुसज्ज शहर म्हणून नवी मुंबईकडे पहिले जातं. त्यामुळे शहरी भाग, गावठाण भाग, तसेच झोपडपट्टी भागदेखील वाढू लागला आहे. रोजगारासाठी एपीएमसीसारखी मोठी बाजारपेठ या शहरात उपलब्ध होऊ लागली आहे. ठाणे बेलापूरसारखा मोठा औद्योगिक पट्टा असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. या शहरात राहण्यासाठी देशातील विविध नागरिकांची प्रमुख पसंती असल्याने या शहराला प्रति भारत संबोधले जाते. मात्र आता या शहरात बांगलादेशीय वसू लागल्याचे दिसत आहे. त्यांची मोठ्या प्रमाणात घुसखोरी सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. हे बांगलादेशी नागरिक शहरासोबत गावठाण भागाला मुख्य लक्ष करत आहेत. शहरातील सर्वच गाव गावठाणात यांचे वास्तव्य पहायला मिळत आहे. या गावठाण भागात घर मिळवणे सहज सोपे झाले आहे. त्यात स्वस्त भाड्यात घरे मिळत असल्याने यांचा जोर गावातील भागात जास्त असतो. भाड्याने देताना भाड्याच्या पैशांकडे पाहिले जात असल्याने, भाडेकरूची ओळख देखील तपासली जात नसल्याचे वास्तव समोर येत आहे. त्यांची कोणतीही कागदपत्रे तपासली जात नसल्याचे समोर येत आहेत.
या बांगलादेशी नागरिकांकडे अनधिकृतपणे कागदपत्रे मिळू लागली आहेत, तर अनेकदा बनावट कागदपत्रे बनवून, घर मालकांना दाखवून वास्तव्य केले जात आहे. मात्र पोलिसांच्या कारवाईत सापडल्यावर घर मालकांना आपल्या घरात बांगलादेशी राहत असल्याचे निष्पन्न होत आहे. मात्र तरीही घर भाड्याने देताना अनेकदा मिळणारे भाडे पाहून घरमालक दुर्लक्ष केले जात आहे.या नागरिकांकडे भारतीय पॅन कार्ड, आधार कार्ड,रेशनकार्ड सारखी ओळखपत्रे देखील मिळत आहेत. पोलीस तपासात अनेकदा याबाबी समोर आलं आहे. त्यामुळे यावर मुळासकट कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत. त्यासाठी बनावट कागदपत्रे बनवून देणारी रॅकेट उध्वस्त करण्याचे प्राथमिक आव्हान पोलिसांसमोर आहे.
नवी मुंबई, पनवेलला बारचे शहर म्हणून ओळखले जाते. यात अनधिकृतपणे भारतात येऊन राहिलेल्या बहुतांश बंगलादेशी महिला या वास्तव्य करून वेश्याव्यवसायात उतरल्याचे दिसून येत आहे. अनेक गावांमधून अनेक महिला बारमध्ये जताना दिसतात. शिरवणे गावात तर अशा बार विरोधात आंदोलने देखील करण्यात आली असून, बारगर्ल्सना घरे देऊ नका असे आवाहन गावातून करण्यात येत आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत चालू वर्षात आत्तापर्यंत 29 गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यात 72 बांगलादेशी नागरिकांना आरोपी करण्यात आल आहे. अटक नागरिकांना न्यायालयात सादर केले जाते. न्यायालयाने सुनावलेली शिक्षा भोगल्या नंतर त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करून त्यांना भारत बांगलादेश सीमेवरील भारतीय सीमा सुरक्षारक्षक दलाकडे सुपूर्द करण्यात येते. त्यानंतर सीमा सुरक्षारक्षक त्यांच्या मुलुखात रवानगी करतात. चालू वर्षात 14 बांगलादेशी आरोपीची त्यांच्या देशी पुन्हा रवानगी केली असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले.