कर्जत नगरपरिषदेची जुनी इमारत कोसळली

| कर्जत | प्रतिनिधी |

दोन-तीन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे मोडकळीस आलेली कर्जत नगरपरिषदेची कौलरू असलेली जुनी इमारत कोसळली. ही घटना शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. ही इमारत कोसळत असताना इमारतीच्या आजूबाजूला बसणाऱ्या फेरीवाल्यांची एकच धावपळ झाली. ही इमारत जागेवरच कोसळल्याने कोणालाही साधे खरचटलेसुद्धा नाही.

ही इमारत खूप जुनी आहे. त्यावेळच्या कुलाबा लोकल बोर्डाने ही इमारत बांधली होती. धर्मशाळा अशी नोंद या इमारतीची आहे. येथे सुरुवातीला वाचनालय सुरु केले होते. कर्जत ग्रामपंचायतीचा गाडा येथून हाकला गेला. पहिले सरपंच ॲड. यशवंत गुप्ते हे सलग पाच वेळा बिनविरोध निवडून आले होते. ते पंचवीस वर्षे सरपंच होते. त्यांच्यासह लक्ष्मीकांत तथा बाबुराव दिवाडकर, लियाड्रॉ सेबास्टियन डिमेलो, वसंत दगडे, शांतीलाल परमार, तुकाराम सुर्वे, अनंत जोशी आदींनी सरपंच म्हणून येथूनच काम केले होते. कर्जत ग्रामपंचायतीमधील कर्जत, मुद्रे (बुद्रुक), मुद्रे (खुर्द), भिसेगाव आणि गुंडगे ही पाच गावे, दहिवली ग्रामपंचायत आणि शिरसे ग्रामपंचायतीमधील आकुर्ले गाव अशी सात गावे मिळून 1992 साली ऑक्टोबर महिन्यात नगरपरिषद उदयास आली. प्रथम नगराध्यक्ष रमेश चंदन, धनंजय चाचड, वसंत भोईर, वनिता म्हसे, शरद लाड, शुभांगी जाधव, स्मिता पतंगे, सुनंदा कांगणे, अस्मिता मोरे यांनी याच कौलरू इमारतीतून नगरपरिषदेचा कारभार केला होता.

वसंत भोईर यांनी आपल्या कार्यकाळात या इमारतीच्या अर्ध्या भागाची दुरुस्ती करून सभागृह आणि नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्यासाठी स्वतंत्र दालने तयार केली होती आणि पोटमाळा तयार करून काही विभागाच्या कर्मचाऱ्यांची बसण्याची व्यवस्था केली होती. ही घटना 2000-01 सालातील. या इमारतीतून अनेक निर्णय घेण्यात आले. ऑगस्ट 2013 मध्ये अस्मिता मोरे नगराध्यक्ष असताना कर्जत नगरपरिषदेच्या नवीन इमारतीची उभारणी करण्यात आली. तेव्हापासून ही इमारत रिकामी होती. या इमारतीच्या दुरुस्त केलेल्या भागात आधार केंद्र सुरु आहे.

या इमारतीच्या जागी नवीन इमारत व्हावी, अशी अनेकांची अपेक्षा होती. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे येथे काहीच करता येत नव्हते. येथे नव्याने इमारत बांधताना वाणिज्य गाळे बांधून तीन-चार मजली पार्किंग तयार केल्यास कर्जतकरांची पार्किंगची समस्या मिटेल. कर्जत नगरपरिषदेकडून धोकादायक इमारतींना नोटीसा दिल्या जातात व त्या पाडण्यासाठी सांगतात. मग ही इमारत आत्तापर्यंत का पडली नाही? असा प्रश्न कर्जतकरांना पडला आहे.

Exit mobile version