सर्वात जुनी समजली जाणारी पहिल्या इमारतीचा भाग कोसळला
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ गावातील सर्वात जुनी समजली जाणारी आणि पहिल्या इमारतीचा काही भाग कोसळला. या इमारतीमधील बहुतांश रहिवाशांनी इमारत जुनी झाल्याने आपली घरे रिकामी केली आहे. मात्र, आजही एक कुटुंब तेथे निवास करून राहात असून, ग्रामपंचायत प्रशासनाने अद्याप या इमारतीला धोकादायक ठरवले नाही, याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
कर्जत तालुक्यातील जिते या गावातील मूळ रहिवासी असलेले आणि गेली 50 वर्षे ठाणे येथे राहणाऱ्या जाधव कुटुंबाने नेरळ गावातील पहिली इमारत 1972 मध्ये बांधली होती. तातूशेठ जाधव यांची इमारत म्हणून नेरळ एसटी स्टँड परिसरातील ही इमारत ओळखली जात होती. नेरळ गावात ओळखली जाणारी, परंतु कोल्हारे ग्रामपंचायतीमध्ये असलेली ही इमारत आज 50 वर्षांची झाली आहे. या इमारतीमधील रहिवाशांनी इमारत जुनी झाल्याने यापूर्वीच आपली सदनिका खाली करून अन्य ठिकाणी आसरा घेतला आहे. एवढी जुनी इमारत असूनदेखील या इमारतीला ग्रामपंचायतीकडून धोकादायक ठरविण्यात आले नाही. या इमारतीमध्ये एकमेव कुटुंब आजही राहात आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर हे कुटुंब राहात असून, या इमारतीचा काही भाग आज दि.28 रोजी सकाळी कोसळला. इमारत परिसर निर्मनुष्य असल्याने काही भाग कोसळला असला तरी त्याचा परिणाम कोणालाही जाणवला नाही. मात्र, पावसाळ्यात दरवर्षी प्रशासन धोकादायक इमारतींची यादी बनवीत असते आणि तरीदेखील 50 वर्षांपूर्वीची इमारत आजही धोकादायक इमारतीमध्ये समाविष्ट नाही.
सध्या या इमारतीत निवास करीत असलेले कुटुंब यांना प्रशासन स्थलांतरित करणार आहे की नाही, असा प्रश्न परिसरातील रहिवासी उपस्थित करीत आहेत. सदर इमारत धोकादायक बनल्याने या इमारतीच्या परिसरात राहणारे रहिवासी हे आपल्या लहान मुलांना खेळायला देखील पाठवत नाहीत. त्यामुळे या इमारतीचा परिसर निर्मनुष्य असतो आणि सहसा कोणीही फिरकत नाहीत. त्यामुळे या बिल्डिंग परिसरात सदर जागा मालक यांच्याकडून धोकादायक इमारतींचा बोर्ड लावण्याची परिसरातील रहिवाशी यांची मागणी आहे. त्याचवेळी इमारत परिसरात कोणीही फिरकत नसल्याने गवताचे ढीग वाढले असून, धोकादायक इमारतींचा फलक लावण्याची मागणी जोर धरत आहे.
या इमारतीचे बांधकाम करणारे आणि सदर इमारतीचे मालक आमचे जाधव कुटुंब असून, आम्ही या जागेत नव्याने संकुल उभारणार आहोत. त्यासाठी आम्ही आराखडा बनविला असून, या वर्षात नवीन इमारतीचे काम सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
रमेश जाधव, मालक राहणार ठाणे