रायगडावरून निघणार ऑलिम्पिक क्रीडाज्योत

| महाड । वार्ताहर ।

राज्य सरकार व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 2 ते 12 जानेवारी या कालावधीत शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या क्रीडा स्पर्धेची मुख्य क्रीडाज्योत रॅली रायगड किल्ल्यावरून 4 जानेवारीला सकाळी नऊ वाजता निघणार असून ही क्रीडाज्योत ताम्हिणी घाटातून पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोहचणार आहे.

या मुख्य क्रीडाज्योत रॅलीची सुरुवात किल्ले रायगड येथून 4 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता होणार आहे. याप्रसंगी पुणे येथून 20 धावपटू येणार आहेत. तसेच रायगड जिल्ह्यातूनदेखील क्रीडापटू, इतर शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी होतील.

आयोजन समितीमार्फत किल्ले रायगड येथे फुलांची सजावट करण्यात येणार आहे. या स्पर्धेत एकूण 39 क्रीडा प्रकारांचा समावेश असून एकूण 10 हजार 546 खेळाडू, मार्गदर्शक, पंच सहभागी होणार आहेत. एकूण 39 क्रीडा प्रकारांपैकी 19 क्रीडा प्रकारांचे आयोजन हे शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे येथे होणार आहे. या मुख्य क्रीडाज्योत रॅलीच्या आयोजनाकरिता जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या वेळी महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचे जी.टी.सी.सी. सदस्य आणि क्रीडाज्योत समन्वयक अमित गायकवाड, जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड रवींद्र नाईक हे उपस्थित होते.

Exit mobile version