दीड वर्षांची प्रतीक्षा संपली; नांदगाव आरोग्य पथकात डॉक्टर रुजू

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड तालुक्यातील नांदगाव आरोग्य पथकास तब्बल दीड वर्षांच्या प्रतीक्षेनंतर डॉक्टर मिळाला आहे. त्यामुळे नांदगाव, मजगाव, दांडा, उसरोली, वेळास्ते, काशीद व अन्य गावांतील आरोग्याचा प्रश्‍न सुटला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून येथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने लोकांना आरोग्य प्रश्‍नासाठी खूप दूरवर भटकावे लागत होते. येथे लवकरात लवकर डॉक्टर मिळावा यासाठी सर्व पक्षांनी प्रयत्न केले होते.

आज नांदगाव आरोग्य पथकाचा पदभार डॉक्टर मदिहा मुश्ताक कागदी यांनी स्वीकारताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष शैलेश खोत, मुरुड तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष महेंद्र चौलकर, भाजप तालुका उपाध्यक्ष स्वप्नील चव्हाण, नरेंद्र म्हात्रे, मनसेचे तालुका सचिव राजेश तरे, मनसेच्या मुरुड तालुका महिला अध्यक्षा विद्या जोशी, गजानन भोईर, राहुल गोसावी, आकाश खोत, त्रिशूल कानुगोजे, मुन्ना उलडे, आरोग्य सेविका नीता दळवी आदी पुष्पगुछ देऊन स्वागत केले.

यावेळी उपस्थित सर्वानी पंचक्रोशीतील नागरिकांना डॉक्टरांनी चांगली आरोग्य सेवा द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. भाजप तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर यांनी नांदगाव येथील आरोग्य पथकाचे रूपांतर प्राथमिक आरोग्य केंद्रात होण्यासाठी मंत्री महोदयांकडे मागणी केली असून, लवकरच यश येईल, असे त्यांनी सांगितले.

विविध रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवा देण्याचे मी काम केले आहे. येथील लोकांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न असेल.

डॉ. मदिहा मुश्ताक कागदी
Exit mobile version