गावाचा सर्वांगीण विकास हाच एक ध्यास : चेतन जावसेन

बोर्लीमध्ये आरओ वॉटर प्लांटचे उद्घाटन
। कोर्लई । वार्ताहर ।
शेतकरी कामगार पक्ष व बोर्ली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बोर्ली गावात अनेकविध उपक्रम राबविले जात असून, गावाचा सर्वांगीण विकास हाच एक ध्यास असल्याचे प्रतिपादन ग्रामपंचायतीचे सरपंच चेतन जावसेन यांनी ग्रामपंचायत व साळाव येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या माध्यमातून गावातील जुना बाजार येथे उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण (आरओ) प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
बोर्ली ग्रामपंचायत व जेएसडब्ल्यू कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने जुना बाजार येथे उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा अस्मिता वामन चुनेकर यांच्या हते पार पडला.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच चेतन जावसेन, उपसरपंच मतीन सौदागर, मनोहर भोपी, सदस्य गणेश कट, भारती बंदरी, शिंदे मॅडम, भारती पाटील, ग्रामविकास अधिकारी पी.जे.गाडेकर, ग्रामस्थ विशेष करून महिला उपस्थित होत्या.
गेल्या अनेक वर्षांपासून फणसाड धरणातून जलवाहिनीद्वारे गावाला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतु, याठिकाणी जलशुद्धीकरण यंत्रणा नसल्याने शुद्ध पाणीपुरवठ्याची गरज भासत होती. ग्रामपंचायत व जेएसडब्ल्यू कंपनीच्या माध्यमातून हा प्रश्‍न सुटला असून, 50 पैसे प्रतिलीटर या अल्प दराने आरओ पाणी उपलब्ध होणार असल्याचे सरपंच चेतन जावसेन यांनी यावेळी सांगितले.

Exit mobile version