| अलिबाग | प्रतिनिधी |
गणरायाचे ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घरोघरी आगमन होणार आहे. त्यामुळे अवघे 55 दिवस शिल्लक राहिले आहेत. जिल्ह्यातील गावागावात कच्च्या गणेशमुर्तींना पॉलीश करण्यापासून रंगकाम करण्याची लगबग सुरू झाली आहे. त्यातून अनेक गावांतील नागरिकांना रोजगाराचे दालन खुले झाले आहे.
पेणमधील गणेशमुर्ती आकर्षक व रेखीव असतात. त्यामुळे गणेशमुर्ती तयार करण्याचे माहेर घर म्हणून पेण तालुक्याकडे पाहिले जाते. पेणमधील गणेशमुर्तीला रायगड जिल्ह्यासह वेगवेगळ्या राज्यात, देश, विदेशात मागणी असते. स्थानिकांकडूनही पेणच्या मुर्तीला पसंती दर्शविली जाते. गणेशमुर्ती तयार करण्यापासून त्या रंगविणे, पॉलीश करणे अशी अनेक कामे करण्याचे काम सुरू झाले आहे. पेणमधून कच्च्या मुर्ती घेऊन गावागावात त्यांना रंगकाम करण्याचे काम सूरू करण्यात आले आहे. अलिबाग शहरासह ग्रामीण भागांत मुर्तींना रंगविण्याचे काम वेगाने सूरू झाले आहे.
दरम्यान, मुर्तींना पॉलीश करणे, रंगविणे अशा अनेक प्रकारची कामे करण्यासाठी स्थानिकांना रोजगार प्राप्त होऊ लागला आहे. विशेष म्हणजे महिला वर्गदेखील ही कामे आवडीने करीत असल्याचे चित्र आहे. अलिबाग तालुक्यातील वावे येथे गणेशमुर्ती रंगविण्याचे काम सुरू झाले आहे. वेगवेगळ्या भागातून या मुर्तींना मागणी वाढली असून बुकींग सूरू असल्याचे मुर्तीकाराकडून सांगण्यात आले आहे.







