| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
महाराष्ट्रातील प्रख्यात धार्मिक स्थळ असलेले अष्टविनायक तीर्थक्षेत्र व सुधागड तालुक्यातील मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या पालीतील बसस्थानकाची जुनी इमारत तोडून एक ते दीड वर्षे इतका कालावधी उलटून गेला तरीदेखील नवीन इमारत अजूनही बांधण्यात आलेली नाही. पालीतील जनतेच्या संकल्पनेतील सुसज्ज व सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण बसस्थानक लवकरच साकारले जावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिष्टमंडळाच्या माध्यमातून भेट घेऊन प्रश्न निकाली काढणार असल्याचे शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांनी सांगितले.
पाली बस स्थानकाच्या दुरावस्थेबाबत पत्रकार रवींद्रनाथ ओव्हाळ व विविध सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी याबाबत सातत्याने आवाज उठवला होता. नवीन बसस्थानकाच्या इमारतीअभावी येथील प्रवासी व कर्मचारी यांची प्रचंड गैरसोय होत आहे. ही गैरसोय थांबावी यासाठी प्रशासन दरबारी सातत्याने आवाज उठवूनदेखील कोणतीही ठोस कृती होत नसल्याची बाब समोर आलीय. सध्या याठिकाणी प्रवासी नागरिक जनतेसाठी तात्पुरती निवारा शेड उभारण्यात आली. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, वृद्ध , लहान मुले, विद्यार्थी व नागरिक यांना बसस्थानकात त्रास सोसावा लागतोय, तर पावसाळ्यात देखील प्रवासी जनतेला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. अशातच नवीन इमारतीचे काम कुठे रेंगाळले, लालफितीत हे काम का अडकले आहे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हा प्रश्न जलदगतीने सोडवावा, यासाठी साकडे घालणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.