| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
तमिळनाडूमध्ये सरकार स्थापनेबाबत सुरू असलेला सस्पेन्स आता संपुष्टात येण्याची चिन्हं दिसत आहेत. तमिळगा वेत्री कळघमचे (टीव्हिके) प्रमुख विजय यांनी गुरुवारी (दि.7) राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा सादर केला आहे. आवश्यक संख्याबळ आपल्या बाजूने असल्याचा दावा त्यांनी केला असून शपथविधीनंतर विधानसभा सभागृहात सहज बहुमत सिद्ध करू, असा विश्वासही राज्यपालांना दिला आहे. विजय यांनी सरकारला पाठिंबा देणाऱ्या पक्षांची आणि आमदारांची माहिती राज्यपालांकडे सादर केली आहे. सरकार स्थिर राहील आणि कोणतीही राजकीय अस्थिरता निर्माण होणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. विजय यांच्या दाव्यावर राज्यपाल समाधानी असल्याचे सांगितले जात असून त्यानंतर त्यांना औपचारिकरित्या सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विजय यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारचा शपथविधी शुक्रवार किंवा शनिवारी चेन्नईमध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सोहळ्यासाठी टीव्हिकेचे वरिष्ठ नेते, मित्रपक्षांचे प्रतिनिधी आणि देशभरातील अनेक प्रमुख राजकीय नेत्यांना निमंत्रित केले जाणार असल्याची चर्चा आहे.
विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा
